अहमदाबाद – होय नाही, होय नाही करत अखेर आम आदमी पार्टीने गुजरात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. पक्षाचे गुजरात प्रभारी गोपाळ राय यांनी ही माहिती दिलीय. येत्या 17 सप्टेंबरला एका रॅलीच्या माध्यमातून आम आदमी पार्टी आपल्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे. गुजरातमधील भाजप सरकारवर जनता प्रचंड नाराज आहे. मात्र आजपर्यंत राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस हा खिळखिळा झाला आहे. त्यामुळे आम आदमी पार्टी गुजरातमध्ये एक चांगला पर्याय म्हणून पुढे येईल असा विश्वास राय यांनी व्यक्त केलाय.
विधानसभेच्या सर्वच्या सर्व 182 जागा लढवणार का याबाबत मात्र राय यांनी काहीच उत्तर दिलं नाही. ज्या ज्या ठिकाणी चांगले उमेदवार मिळतील आणि पक्षाचे चांगले संघटन आहे त्या ठिकाणी उमेदवार उभे केले जातील असंही राय यांनी सांगितलं. त्यामुळे आम आदमी पार्टी आता किती जागांवर उमेदवार उभे करते आणि त्याचा फायदा तोटा कोणाला होतो याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
दिल्ली विधानसभेत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर 2015 मध्ये आम आदमी पार्टीने गुजरातमध्ये मोदींच्याविरोधत लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यामुळे आम आदमी पार्टीने गुजरात निवडणूक लढवावी की नाही याबाबत पक्षात मत मतांतरे होती. अखेर पक्षाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
COMMENTS