अखेर मायावतींनी राज्यसभेच्या खासदारपदाचा दिला राजीनामा

अखेर मायावतींनी राज्यसभेच्या खासदारपदाचा दिला राजीनामा

राज्यसभेत दलितांवरील अत्याचाराच्या घटनांवरून  बसप प्रमुख मायावती यांनी सरकारवर कडाडून टीका केली. भाजप देशभरात जातीयवाद पसरवत आहे, असा आरोप करत त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. मला सभागृहात बोलू दिलं नाही तर खासदारकीचा राजीनामा देईन असा इशारा मायावतींनी राज्यसभेत दिला होता.अखेर त्यांनी  आज संध्याकाळी पाच वाजता  उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलाय. मात्र, मायावतींचा राजीनामा मंजूर केला जाणार नाही, अशी सूत्रांची माहिती आहे.

”मी ज्या समाजातून येते, त्यांचेच मुद्दे मला सभागृहात मांडता येत नसतील, तर काय उपयोग?, असे मायावती यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

दरम्यान, भाजपवर जातीयवादाचा आरोप करणाऱ्या मायावतींनी माफी मागावी अशी मागणी भाजप खासदारांनी लावून धरली होती. त्यामुळे त्या सभागृहाबाहेर पडल्या होत्या.

उत्तर प्रदेशातील दलितांवरील अत्याचाराचा मुद्दा मायावती राज्यसभेत उपस्थित केला होता. मात्र, त्यांना बोलण्याची संधीच दिली गेली नाही, त्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

COMMENTS