मतदान यंत्राबाबत विरोधी पक्षाकडून घेत असलेल्या आक्षेपला बळ मिळणार एक पत्र समोर आलंय. इतर कुणी नाही तर उत्तर प्रदेशातील निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणुक आयोगाला ते पत्र लिहिलंय. या पत्रामुळं ईव्हीएमबाबतचा गोंधळ अधिकच वाढला आहे. येत्या जुलैमध्ये उत्तर प्रदेशात पालिकेच्या निवडणुका आहेत. त्यासाठी नवीन मतदानयंत्रे देण्याची मागणी उत्तर प्रदेशच्या निवडणुक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. सध्याच्या मशीन्स या 2006 पूर्वीच्या आहेत. यापुढे या मशीन्स वापरता येणार नाहीत. त्यामुळे त्वरीत नवीन मतदानयंत्रे पाठवावीत. नवी मतदान यंत्रे आली नाही तर मतदान पत्रिकेद्वारेच मतदान घ्यावे लागेल असं या पत्रामध्ये कळवण्यात आलंय.
२००६च्या आधीची ईव्हीएम केंद्रीय निवडणूक आयोगाने बाद केली आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या निवडणूक आयुक्तांनी लिहिलेलं पत्र फार महत्त्वाचं ठरणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही अशाचप्रकारचा आक्षेप घेतला होता. राजस्थानमधील धौलपूर येथे ईव्हीएममध्ये कथित फेरफाराची तक्रार करण्यात आली होती. हे मशीन २००६च्या आधीचं होतं. याशिवाय पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरही बसपा अध्यक्षा मायावती, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनीही ईव्हीएमवर आक्षेप घेतला होता. परवाच विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन हा मुद्दा उचलला आहे. सुप्रीम कोर्टातही याबाबत एक अर्ज प्रलंबित आहे. यामुळे ईव्हीएमचा मुद्दा येत्या काळात अधिक चिघळणार असे दिसत आहे.
COMMENTS