अन् अजित पवार पत्रकारांवर भडकले

अन् अजित पवार पत्रकारांवर भडकले

काही दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या निवडणुकीमधे राष्ट्रवादीने भाजपशी तर काँग्रेसने शिवसेनेसोबत आघाडी केली. आज हेच पक्ष राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधात एकत्रितपणे मोर्चा काढत असल्याबाबत प्रश्न पत्रकार परिषदेत विचारताच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पारा चढला, त्यांनी माईक हाती घेत पत्रकारांना खडे बोल सुनावले.

संघर्ष यात्रा नाशिक येथे पोहचल्यावर मंगळवारी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीत अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने भाजपशी युती केली. त्या अंतर्गत पक्षाच्या माजी आमदाराने सदस्यांची मुख्यमंत्र्यांशीही भेट घडवून आणली. तेव्हा संबंधित माजी आमदार राष्ट्रवादीचे आहेत की भाजपचे असा प्रश्नही उपस्थितांना पडला होता. या अनुषंगाने प्रश्न उपस्थित झाल्यावर अजित पवारांना राग अनावर झाला. दादांचा पारा चढल्याचे पाहून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हस्तक्षेप करत प्रश्नाचे उत्तर देऊन बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

स्थानिक स्तरावर झालेली आघाडी आणि विरोधकांनी काढलेली संघर्ष यात्रा यांची कोणी गल्लत करू नये. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यातील विरोधी पक्ष एकत्रितपणे लढा देत आहेत. सर्व नेत्यांच्या दृष्टीने कर्जमाफीचा निर्णय होणे यास महत्व आहे. सर्वपक्षीय विरोधकांचा शेतकऱ्यांना दिलासा देणे हा एकमेव अजेंडा आहे. आमचे सर्व सदस्य निलंबित केले तरी चालतील, परंतु, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष वा उपाध्यक्षपद हा गौण विषय आहे. आम्ही आमची आमदारकी ओवाळून टाकण्याच्या मानसिकतेपर्यंत आलो असल्याचं अजित पवार यांनी सांगितले.

COMMENTS