मुंबई – शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चवाट्यावर आला आहे. ‘मातोश्री’वरील शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांच्या बैठकीत दोन वेळा खडाजंगी झाली. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार घडला.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या सर्व मंत्री आणि आमदारांची बैठक सोमवारी ‘मातोश्री’वर पार पडली. यावेळी आमदारांनी सरकारविषयी बोलताना नाराजी व्यक्त केली. सरकारकडून मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळत नाही, आपल्याच पक्षातील मंत्र्यांकडून कामे होत नाही अशा तक्रारी शिवसेनेच्या आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या. तसेच, दालनात गेले की नीट वागणूकही मिळत नाही अशा स्वरुपाच्या तक्रारी आमदारांनी केल्याचे कळते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी, तुमचा नक्की रोष सरकारवर आहे की आपल्या मंत्र्यांवर हे एकदा व्यवस्थित ठरवा आणि मग माझ्याशी चर्चा करा, असे म्हटल्याचे कळते.
या बैठकीनंतर शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि पुण्यातील खासदार खासदार श्रीरंग बारणे यांच्यात खडाजंगी झाली. ‘निलम गोऱ्हेंनी भाजप आमदार लक्षण जगतापांना शिवसेनेत यावे असे आमंत्रित केलं आहे. त्यांना हा अधिकार कोणी दिला? निलम गोऱ्हेंनी आम्हाला शिवसेना काय आहे, हे शिकवू नये.’ असे श्रीरंग बारणे म्हणाले.
‘माझी शिवसेनेवरची निष्ठा काय आहे, हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे. मला माझी निष्ठा कोणाला सांगायाची गरज नाही.’ असं प्रतीउत्तर निलम गोऱ्हे यांनी खा. श्रीरंग बारणे यांना दिलं. विशेष म्हणजे खासदार श्रीरंग बारणे बोलल्यानंतर निलम गोऱ्हे यांना रडू कोसळलं. एकंदरीतच ‘मातोश्री’वरील बैठकीत शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
COMMENTS