अमेरिकेच्या गुप्तहेर महिलेने केले अतिरेक्याशी लग्न

अमेरिकेच्या गुप्तहेर महिलेने केले अतिरेक्याशी लग्न

‘आयएस’ या दहशतवादी संघटनेत अतिरेक्यांची भरती करणाऱ्या एका अतिरेक्याचा शोध घेता घेता एफबीआयची एक महिला अधिकारी या अतिरेक्याच्या प्रेमात पडली आणि त्याच्याबरोबर पळून गेल्याची घटना समोर आली आहे. तसेच त्याच्याशी तिने लग्नही केले आहे. मात्र, पश्चात्ताप झाल्यावर पुन्हा मायदेशी परतलेल्या या महिलेवर कारवाई करण्यात आली असून सध्या ती तुरुंगात आहे.

डॅनियल ग्रीन असे या महिलेचे नाव आहे. ती 2014 मध्ये सीरियाला आली होती. तिथेच तिने आयएसचा अतिरेकी असलेल्या डॅनिस कस्पर्ट या जर्मन व्यक्तीशी लग्न केले. यानंतर अमेरिकेच्या एका न्यायाधीशाने हे प्रकरण सार्वजनिक न करण्याचा आदेश दिला होता. मात्र फेडरल न्यायालयाचे सर्व रेकॉर्ड जनतेसाठी खुले करण्यात आल्यानंतर ग्रीनच्या प्रेमकहानीचाही खुलासा झाला.

फेब्रुवारी2015 मध्ये अमेरिकन सरकारने डॅनिसला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले होते. आयएसच्या प्रचाराच्या एका व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या मुंडक्यासोबत डॅनिस दिसला होता. एफबीआयने फेब्रुवारी 2014 मध्ये डॅनिसचा तपास करण्याचे काम ग्रीनला सोपविले होते. ती एफबीआयमध्ये अनुवादक म्हणून काम पाहत होती. ग्रीनला जर्मन भाषा अवगत होती. चौकशीचे काम सोपविण्यात आल्यानंतर सहा महिन्याने ती सीरियाला गेली होती. तिथेच तिने डॅनिसशी विवाह केला.

ग्रीन मुळची झेकोस्लोव्हाकियाची आहे. आई-वडिलांना भेटायला जर्मनीला जात असल्याचे एफबीआयला खोटे सांगून ती सीरियाला गेली होती. जर्मनीऐवजी ती आधी तुर्कस्थानात पोहचली. तिथून स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीने सीमापार करून ती सीरियाला आली. धक्कादायक म्हणजे डॅनिसशी विवाह करण्यापूर्वी तिचे लग्न झालेले होते. अमेरिकन नवऱ्याला घटस्फोट न देताच तिने हे लग्न केले.

COMMENTS