आयोध्येतील बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना सीबीआय कोर्टाने साक्षीदार म्हणून बोलावले आहे. येत्या 23 तारखेला लखनऊ न्यायालयात हजर राहण्याचे आदेश कोर्टाने संजय राऊत यांना दिले आहेत. या प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते आरोपी आहेत. यामध्ये लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, विष्णू हरी दालमिया, साध्वी ह्ररतंभरा, महंत नृत्य गोपालदास, महंत राम विलास वेदांती, वैकुंठलाल शर्मा उर्फ प्रेमजी, चंपतराय बन्सल, महंत धरमदास, सतीश प्रधान यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंह हे सध्या ते राजस्थानचे राज्यपाल आहेत. संविधानिक पदावर असल्यानं त्यांचे नाव वगळले. तर बाळासाहेब ठाकरे, गिरीराज किशोर, अशोक सिंघल, महंत अवैद्यनाथ, परमहंस रामचंद्र, मोरेश्वर सावे यांचं निधन झाल्यामुळे नाव वगळले. बांधकाम पाडल्यानंतर भाजपनं यामध्ये आपला काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाडणारे जर शिवसैनिक असतील तर मला त्याचा अभिमान आहे असं वक्तव्य केलं होतं. याच काळात सामनातून छापलेल्या बातम्यांबाबत संजय राऊत यांना वाचारणा केली जाण्याची शक्यता आहे.
COMMENTS