ऑपरेशन क्लिन मनीच्या दुसऱ्या टप्प्यात नोटाबंदीनंतर मोठ्या रकमेचे व्यवहार करणारे लोक आयकर विभागाच्या रडारवर असणार आहेत. या दुसऱ्या टप्प्यात आयकर विभागाकडून 60 हजार लोकांची चौकशी करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या नोटाबंदीनंतर काळा पैसा उजेडात आणण्याचे प्रयत्न आयकर विभागाकडून केले जात आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने 9 नोव्हेंबर 2016 ते 28 फेब्रुवारी 2017 या कालावधीत 9 हजार 334 कोटींचा काळा पैसा उघड केल्याची माहिती दिली आहे. ‘यासोबतच पहिल्या टप्प्यात प्रतिसाद न दिलेल्या अनेकांची दुसऱ्या टप्प्यात कसून चौकशी करण्यात येणार आहे, असेही केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
‘नोटाबंदीनंतरच्या कालावधीत मोठ्या रकमेचे व्यवहार करणाऱ्या, अधिक रकमेच्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. मोठ्या रकमेच्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा आकडा 6हजारांहून अधिक आहे. तर अधिक रक्कम पाठवली गेल्याची 6,600 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या प्रकरणी एकूण 60 हजार लोक रडारवर आहेत.
ऑपरेशन क्लिन मनीच्या दुसऱ्या टप्प्यातील कारवाई आधी बँक खात्यांचा तपशील तपासण्यात आला आहे. 31 जानेवारीला ऑपरेशन क्लिन मनीच्या पहिल्या टप्प्यातील कारवाई झाली होती. या कारवाईदरम्यान आयकर विभागाने एकूण 17.92 लाख लोकांची चौकशी केली. यामधील 9.46 लाख लोकांची चौकशी आयकर विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. तर इतरांची चौकशी ऑनलाइन करण्यात आली होती.
COMMENTS