राजकीय पक्षांनी ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोपांनंतर आज निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांची बैठक घेतली. यावेळी निवडणूक आयोगाच्या वतीनं पारदर्शी मतदानाबद्दल राजकीय पक्षांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच ईव्हीएममध्ये छेडछाड करणं कसं अशक्य आहे, याचं प्रात्यक्षिक यावेळी देण्यात आलं.
ईव्हीएम हॅकिंगसंदर्भात निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांना आव्हान दिलं आहे. आयोगानं रविवारी सर्व पक्षांना पुन्हा आमंत्रित केलं असून, यावेळी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना ईव्हीएम मशीन हॅक करुन दाखवावं असं, खुलं आव्हान निवडणूक आयोगाने दिलं आहे. यावेळी राष्ट्रीय तसंच प्रादेशिक पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. मागील काही निवडणुकांमध्ये वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन्सवर अनेक राजकीय पक्ष संशय व्यक्त केला आहे. ईव्हीएम विषयीचा हाच संशय दूर करण्यासाठी आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
राज्यातील पाच निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर आम आदमी पार्टी, बसपाने ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. बसपानं ईव्हीएम टेम्परिंगचा आरोप करत, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. तर गुरुवारी आम आदमी आदमी पक्षानं निवडणूक आयोगासमोर ईव्हीएम टेम्परिंगचा डेमो सादर केला होता. केजरीवाल आणि मायावती यांच्याशिवाय काँग्रेससह एकूण 16 पक्षांनी ईव्हीएम टेम्परिंगप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसारच आज निवडणूक आयोगानं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत आम आदमी पार्टीच्या वतीनं दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांनी पक्षाची भूमिका मांडली.
COMMENTS