मुंबई – हागणदारीमुक्तीकडे महाराष्ट्राने यशस्वी वाटचाल केली आहे. हागणदारीमुक्तीसंदर्भात अधिक व्यापक जनजागृती करण्यासाठी येत्या 9 ऑगस्ट क्रांतिदिन ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन या दरम्यान“उघड्यावर शौचविधीपासून स्वातंत्र्य” या जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
लोणीकर यांनी सांगितले की, स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 9 ते 15 ऑगस्ट या संपूर्ण सप्ताहादरम्यान, “खुले मे शौचसे आझादी” ही हागणदारीमुक्तीसाठी मोठी मोहीम सर्वत्र राबवावी असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रातही त्यादरम्यान, हा सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सध्या हागणदारीमुक्त राज्यांमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर आहे. मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचा हा परिणाम असून लवकरच महाराष्ट्र पूर्णत: हागणदारीमुक्त होणार आहे. जनजागृती अधिक व्यापक स्वरूपात व्हावी, यासाठी या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात रॅली, मानवी साखळी, विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. उघड्यावर शौच टाळून शौचालयांचा वापर करण्यासाठी ग्रामस्थ, नागरिकांना प्रेरीत केले जाणार आहे. संपूर्ण राज्यभर कार्यक्रमांचे आयोजन करून स्थानिक पातळ्यांवरही ख्यातनाम व्यक्तींना या मोहीमेत सहभागी करून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जाणार आहे. सर्वांनी या मोहीमेत सहभागी होऊन महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्यास योगदान द्यावे, असे आवाहन बबनराव लोणीकर यांनी केले आहे.
11 जिल्हे हागणदारीमुक्त
स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू केले असून यातून आतापर्यंत 11जिल्हे, 156 तालुके, 17 हजार 74 ग्रामपंचायती आणि 24 हजार 501 गावे हागणदारीमुक्त झाले आहेत. मागील एका वर्षात राज्यात 20 लाख शौचालये बांधण्यात आली असून हा एक विक्रम आहे. मार्च 2018 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त होईल, असा विश्वास लोणीकर यांनी व्यक्त केला.
COMMENTS