योगी आदिनाथ यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर काही तासातच हल्लेखोरांनी बीएसपी नेता मोहम्मद शमी यांचा खून केला. अलाहाबाद शहरापासून जवळच असलेल्या मऊआइमा परिसरात ही घटना घडली आहे.
मोहम्मद शमी हे मध्यरात्री घरी परत जाताना हल्लेखोरांनी संधी साधत त्यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती सुत्रांनी दिली. मोहम्मद शमी हे उत्तरप्रदेशातील बहुजन समाज पक्षाचे वरिष्ठ नेते होते. ते अनेक वेळा पक्षाचे ब्लॉक प्रमुख म्हणून राहिले आहेत. समाजवादी पक्षात दोन दशके राजकारण केल्यानंतर काही महिन्यापूर्वीच ते बहुजन पक्षात दाखल झाले होते. 2002 ते प्रतापगड जिल्ह्यातील कुंडा मतदार संघातून राजा भैय्या यांच्या विरोधात विधानसभा निवडणूकही लढले आहेत. समाजवादीने तिकीट देऊनही तेव्हा त्यांना हार मानावी लागली होती.
दरम्यान या घटनेनंतर त्यांच्या परिवारांकडून पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. शमी यांच्यावरही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शमी यांच्या खुनामुळे त्यांच्या समर्थकांनी जोरदार गोंधळ घालत अलाहाबाद-फैजाबाद महामार्गावर आंदोलन केले. त्यामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक खोळंबली होती.
COMMENTS