देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची माळ अखेर योगी आदित्यनाथ यांच्या गळ्यात पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आदित्यनाथ यांना दिल्लीत बोलावणे आल्यानंतर तेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत, अशी चर्चा सुरू होती. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
योगी आदित्यनाथ गोरखपूर येथून पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. प्रखर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे ‘भाजप’ने आपले हिंदुत्ववादाचे मुळचे मुद्दे सोडलेले नाहीत, असाच संदेश दिला आहे.
भाजपचे राज्य अध्यक्ष केशव प्रसाद मौर्य, रेल्वे आणि दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांची नावे मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर होती. पण शनिवारी दुपारी योगी आदित्यनाथ यांना तातडीने दिल्लीला बोलवण्यात आले. भाजपच्या यूपीमधील यशात मागास वर्गीय, गैर- यादव ओबीसी आणि गैर जटाव दलित यांचा मोठा वाटा आहे, त्यामुळे मुख्यमंत्री पदावर ओबीसी जातींमधील नेत्याची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात होती. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्वत:च मुख्यमंत्री पद स्वीकारण्यास नकार दिल्याचे सांगितले जाते. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांची या पदासाठी निवड करून भाजपने सर्वच अंदाज चुकीचे ठरवले आहेत.
COMMENTS