उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांकडून प्रचारासाठी एकुण 5,500 कोटी रुपये खर्च करण्यात आला असल्याचा दावा सीएमएसच्या अभ्यासात केला आहे. या अभ्यासानुसार एक हजार कोटी रुपयांची रक्कम लोकांमध्ये वाटण्यात आली असुन एकतृतीयांश मतदारांनी आपल्याला मतदानासाठी पैसे किंवा मदय़ देऊ केल्याचे एका सर्वेक्षणात मान्य केले आहे.
यंदाच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांतील प्रत्येक मताची किंमत अंदाजे 750 रुपये आहे. हा आकडा देशातील इतर राज्यांशी तुलना करता सर्वाधिक असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. यंदाच्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशमधून जवळपास 200 कोटी आणि पंजाबमधून 100 कोटींपेक्षा जास्त रक्कम जप्त केली गेली. त्याचप्रमाणे एक हजार कोटी रुपयांची रक्कम ही मतदारांमध्ये वाटण्यात आली आहे. निवडणूक प्रचारांसाठी बऱ्याच पारंपरिक आणि अपारंपरिक पद्धतींचा अवलंब करण्यात आला. केवळ छापील आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिराती, व्हिडीओ व्हॅन, स्क्रीन पोजेक्टर यांच्यावरच अंदाजे 600 ते 900 कोटींपर्यंत खर्च करण्यात आला.
उत्तर प्रदेशमध्ये केलेल्या सर्वेक्षणात भाग घेतल्यांपैकी ५५ टक्के नागरिकांनी पैसे घेऊन मतदान केलेल्या व्यक्तीला आपण वैयक्तिकरीत्या ओळखत असल्याचे किंवा यासंबंधी माहिती असल्याची कबुली दिली. नोटाबंदीनंतर निवडणुकांमध्ये होणाऱ्या खर्चात अनपेक्षितरीत्या वाढ झाली आहे. ज्या मतदारसंघामध्ये अतितटीची स्पर्धा होती, त्या भागात मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी उमेदवारांकडून 500 ते 2000 रुपये देण्यात आल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.
COMMENTS