सातारा – कोजागिरीच्या रात्री खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या गटांत तुफान राडा झाला. आनेवाडी टोल नाका कुणाचा, यावरून हा वाद झाला. यामध्ये गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी दोन्ही राजेंच्या गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आणेवाडी टोल नाक्याचे व्यवस्थापन बदलल्यानंतर गुरुवारी खासदार उदयनराजे यांनी टोल नाक्यावर जाऊन वाहनांची टोल वसुली थांबवली. रात्री उशीरापर्यंत उदयनराजे टोल नाक्यावर थांबले होते. त्यानंतर आमदार शिवेंद्रराजे यांचे कार्यकर्तेही टोल नाक्याकडे निघाले तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवले. जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील व उपविभागीय अधिकारी धरणे यांनी शिवेंद्रराजे यांच्याशी चर्चा केली. तेव्हा आधी खासदारांना इकडे बोलवा नाहीतर, आम्ही तिकडे जाणार असा पवित्रा आमदार शिवेंद्रराजे यांनी घेतला होता. टोल नाक्यावर उदयनराजे तर विश्रामगृहावर शिवेंद्रसिंहराजे मोठा जमाव घेऊन बसले होते. वातावरण चिघळू नये म्हणून पोलिसांनी उदयनराजे यांना टोल नाक्यावरून जाण्यास सांगितले. त्यानंतर ते साताऱ्याकडे निघाले. त्यावेळी शिवेंद्रराजे सुरूची बंगल्यावर पोहोचले होते. उदयनराजे समर्थकांच्या गाड्याही सुरूचीच्या दिशेने आल्याने दोन्ही गटात समोरा-समोर राडा झाला. यावेळी दगडफेक करण्यात आली. या धुमश्चक्रीत काही कार्यकर्ते व एक पोलीस अधिकारीही जखमी झाले. कार्यकर्त्यांच्या गाड्या फुटल्याने उदयनराजे स्वःत पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. या सर्व प्रकारामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे माध्यमांशी बोलताना म्हणाले, की उदयनराजे यांनी स्टंट करण्याचा प्रयत्न केला. मी फार मोठा डॉन आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला आम्ही ताकद दाखवून दिली आहे. मध्यरात्रीच्या राड्यानंतर खासदार उदयनराजे शेकडो समर्थकांसह शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक संदीप पाटील व इतर पोलीस अधिकारी यांनी सुमारे तासभर उदयनराजेंशी चर्चा झाली. त्यानंतर उदयनराजे गटाच्या समर्थकांची तक्रार नोंदवून घेऊन शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे ही तक्रार वर्ग करण्यात आली. उदयनराजे गटातर्फे अजिंक्य मोहिते यांनी ही तक्रार दिली होती. दरम्यान, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या गटातर्फेही विक्रम पवार यांनी उदयनराजे गटाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. एकमेकांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या दोन्ही तक्रारीत उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोघांचीही नावे आहेत.
दरम्यान, मध्यरात्री झालेला गोळीबार पोलिसांनी केला नाही, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे रात्री केलेला गोळीबार नेमका कोणत्या कार्यकर्त्याने केला, याचा शोध सुरू झाला आहे. परिसरात अजूनही तणावाचे वातावरण असल्याने तेथ वाहतूक बंद करण्यात आली आहे.
COMMENTS