उद्धव ठाकरेंचे `मातोश्री` 2

उद्धव ठाकरेंचे `मातोश्री` 2

बातमीचा मथळा वाचून तुम्ही गोंधळात पडला असाल ना ! गोंधळून जाऊ नका, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या वांद्रेतील कलानगरमधील मातोश्री या बंगल्याच्या जवळच दुसरा एक अलिशान बंगला बांधत आहेत. मुंबई मिरर या इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार उद्धव ठाकरे यांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये कलानगरमधील एक प्लॉट ११.६० कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्यातील १० हजार चौरस फुटांहून अधिक जागेवर ते आपलं नवं घर बांधताहेत. या इमारतीत बेसमेंट, स्टिल्ट आणि सहा मजले आहेत. त्यातील सर्व फ्लॅट ट्रिप्लेक्स असून प्रत्येक फ्लॅटमध्ये पाच बेडरूम आणि एक स्टडी रूम आहे. ‘तलाटी अँड पांथकी’ ही प्रसिद्ध आर्किटेक्चर कंपनी ही इमारत बांधत आहे.

सुरुवातीला या जागेवर कलाकार के के हेब्बर राहत होते. १९९६मध्ये त्यांचं निधन झाल्यानंतर ही जागा त्यांच्या पत्नींच्या नावावर झाली होती. त्यानंतर, ती वारसा हक्काने हेब्बर यांच्या मुलांकडे आली होती. परंतु, २००७ मध्ये सर्व भावा-बहिणींनी ती प्लॅनेटियम इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला ३.५ कोटी रुपयांना विकली होती. प्लॅनेटियमचे मालक राजभूषण आणि जगभूषण दीक्षित यांनी या जागेवर आठ मजली इमारत बनवण्याची परवानगी घेतली होती. त्यांनी हेब्बर कुटुंबाचा दोन मजली बंगला पाडला होता. तसंच, गेल्या वर्षी उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांना भूखंड हस्तांतरणाची सशर्त परवानगी मिळाली होती. त्यानुसार, या जागेतून मिळणाऱ्या रकमेतील ५० टक्के रक्कम राज्य सरकारला द्यावे लागणार होते. त्यानंतर, या जमिनीच्या अधिग्रहण आणि पुनर्विकासासाठी ठाकरे कुटुंबाने कलानगर सहकारी सोसायटीकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेतलं आणि ऑक्टोबर महिन्यात ही जमीन खरेदी केली. ठाकरे कुटुंबानं करारावर स्वाक्षरी करताना प्लॅनेटियम कंपनीला ५.८ कोटी रुपये दिले आणि ५.८ कोटी रुपये उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जमा केले. त्याशिवाय, स्टॅम्प ड्युटीचे ५८ लाख रुपयेही त्यांनीच भरले. लगेचच, १७ ऑक्टोबरला मुंबई महापालिकेनं ठाकरेंना या जागेवर बांधकामाची परवानगी दिली.

COMMENTS