उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील टीकेला राणेंचं जोरदार प्रत्युत्तर!

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील टीकेला राणेंचं जोरदार प्रत्युत्तर!

कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले ज्येष्ठ राजकीय नेते नारायण राणे यांनी आज नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. राणेंच्या नव्या पक्षाचे नाव “महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ असे आहे. या पक्षाचे निवडणूक चिन्ह व इतर बाबींची माहिती लवकरच जाहीर करु, असे राणे यांनी स्पष्ट केले.

यावेळी राणे यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. नारायण राणे म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंचे महाराष्ट्रासाठी योगदान ते काय? लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक अशा सत्तेच्या दोन बाजू असतात. या दोन्ही बाजू त्यांना कळलेल्या नाहीत. मोदींना विरोध करण्याआधी ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केले आहे काय? त्यांनी नोटाबंदीवरुन टीका केली. मात्र वैचारिक, अर्थपूर्ण असे कोणतेही काम त्यांच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळात असताना केले नाही. नोटाबंदी, शेतकऱ्यांचे कर्ज, महागाई, कररचना अशा विषयांचा अभ्यासपूर्ण निषेध शिवसेनेने मंत्रिमंडळात काम करताना नोंदविला आहे काय? कधीही नाही. सेनेचे काही मंत्री तर चक्क झोपतात, अशी माझी माहिती आहे. रस्त्यावरच यायचे होते; तर सत्तेत का गेलात? केंद्र सरकार, राज्य सरकारवर टीका करताना शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेमध्ये अमाप करवाढ केली. यामुळे आता मुंबईत मराठी माणूस घर घेऊ शकत नाही. परंतु याविरोधात उद्धव ठाकरे कधीही बोलत नाहीत. या देशात सर्वांत भ्रष्ट संस्था जर कुठली असेल; तर ती मुंबई महानगरपालिका आहे. मुंबईमध्ये टेंडर घेण्यासाठी सर्वांत जास्त भ्रष्टाचार होतो. ठाकरेंच्या उत्पन्नाचे साधन तरी काय आहे? सामना वृत्तपत्र तर तोट्यात आहे. महानगरपालिकेत कमिशन घेणारे भ्रष्टाचारावर बोलतात तरी कसे?

सत्तेत राहून भांडणापलीकडे सेनेने काहीही केले नाही. सत्तेचे सर्व फायदे उपटत रहायचे, हा शुद्ध स्वार्थीपणा आहे.’ उद्धव स्वत: तर आयत्या बिळावर नागोबा आहेत. पंतप्रधान झालेल्या व्यक्तीविरोधात असल्या शब्दांत टीका करण्याचा उद्धव यांना काय अधिकार आहे?  उद्धव यांची कालची जाहीर सभा हा शिवसैनिकांच्या दृष्टिकोनामधून चेष्टेचा विषय झाला आहे. भाजप-सेनेच्या भांडणामुळे राज्याचा विकास खुंटला आहे. केवळ टीका करण्याचे काम ठाकरे करत आहेत. त्यांना चांगले काही दिसत नाही, चांगले काही कळत नाही.

मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला, याला सेनाच जबाबदार आहे. हिंदुत्वासाठी सेनेने काय त्याग केला आहे? त्याग करणाऱ्या माणसांविरोधात सेनेने टीका करताना आत्मपरीक्षण करावे. यांचे निव्वळ कुजके विचार. शेवटी ठाकरे यांनी रावणाचीच भूमिका बजावली. असेही राणें म्हणाले.

 

 

 

 

 

COMMENTS