भाजपचे राष्ट्राध्यक्ष अमित शहा हे तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. याकरिता महापालिकेत अमित शहा यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले पोस्टर्स हटवले आहेत. काल (शुक्रवारी) महापालिकेने कारवाई करत सर्व पोस्टर्स हटवले आहेत. विशेष म्हणजे महानगर पालिकेवर शिवसेनेचा झेंडा आहे. उद्या म्हणजेच रविवारी अमित शहा शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर जाणार आहेत. मात्र ही भेट होण्याआधीच महापालिकेने पोस्टर्स हटवल्याने भाजपाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शिवसेनेने हा प्रकार मुद्दाम केला असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.
भाजप-शिवेसनेत मागील काही दिवसांपासून शीतयुद्ध सुरु आहे. यात अमित शहा यांचे पोस्टर्स तातडीने हटवल्याने वादाला पुन्हा तोंड फुटले आहे. अमित शहा मुंबई दौ-यावर असल्याने त्यांच्या स्वागतासाठी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पोस्टर्स लावले होते. मात्र महापालिकेने हे पोस्टर्स हटवल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
COMMENTS