उस्मानाबाद – लोकसभा निवडणुकीसाठी अजून दीड ते पावणेदोन वर्ष बाकी असली तरी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार असेल याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सध्याची राजकीय स्थिती विचारात घेतली तर राष्ट्रवादीच्या ताई, भाजपच्या ताई यांच्याविरोधात शिवसेनेचा उमेदवार कोण असणार याबाबत तर्तवितर्क लावले जात आहेत.
सध्याच्या स्थितीत काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढतील अशी शक्यता आहे. त्यानुसार ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेलेली आहे. खरंतर 2014 मध्ये आघाडीची धुळधान उडत असताना राज्यात उस्मानाबाद असा एकमेव लोकसभा मतदारसंघ होता, जिथे तब्बल 6 पैकी आघाडीचे 5 आमदार निवडूण आले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील या उमेदवार असतील अशी चर्चा आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या त्या पत्नी आहेत.
भाजपकडून लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मातोश्री आणि लातूरच्या माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर यांना रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून अर्चनाताई पाटील यांना तिकीट मिळाल्यास रुपाताई पाटील या भाजपकडून नक्की रिंगणात असतील अशी चर्चा आहे. एकतर उस्मानाबाल लोकसभा मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघ येतो. त्यामुळे रुपाताई पाटील या बाहेरच्या उमेदवार ठरणार नाहीत. तसंच रुपाताई पाटील यांचं माहेरही उमरगा मतदारसंघात आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची अधिकची चर्चा सुरू आहे.
भाजप आणि राष्ट्रवादीच्या या दोन ताई रिंगणात उतरल्यास शिवसेनेकडून कोण अशी चर्चा सुरू आहे. विद्यमान खासदार रविंद्र गायकवाड यांना तिकीट मिळणार का याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. विमान मारहाण प्रकरणामुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे त्यांना तिकीट मिळालं नाही तर उस्मानाबादचे माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांनाही तिकीट मिळू शकतं. पुढील दीड वर्षात कशी समिकरणे बदलतात त्यावर तिकीट वाटप अललंबून आहे. मात्र सध्यातरी या नावांची मतदारसंघात चर्चा सुरू आहे.
COMMENTS