नाट्य रसिकांना सात दिवस दर्जेदार कार्यक्रमाची मेजवानी
उस्मानाबाद, – १६ ते २३ एप्रिल या कालावधीत होणार्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात दर्जेदार लोकप्रिय नाट्यकलाकृतींची रसिकांना मेजवानी मिळणार आहे. या नाट्यसंमेलनात ‘ऑल दी बेस्ट’, ‘यदाकदाचित’पासून ‘हसवाफसवी’सारखी विविध लोकप्रिय नाट्यकृती सादर होणार आहे. याबरोबरच एकांकिका, एकपात्री प्रयोगांसह विविध कार्यक्रम सादर होणार आहेत. या संमेलनात स्थानिक कलाकारांनाही विशेष संधी देण्यात आली असून संमेलनातील तीनही रंगमंचावर स्थानिक कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
नाट्यसंमेलनाचा प्रारंभ येथील जिल्हा क्रीडा संकुलावरील मुख्य रंगमंचावर १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता नाट्यमहोत्सवाने होणार आहे. याचे उद्घाटन माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. उद्घाटनानंतर रात्री ७ वाजता अनामय निर्मित ‘ऑल दी बेस्ट’ हे नाटक सादर होणार आहे. महोत्सवाच्या दुसर्या दिवशी १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता सुरश्री प्रॉडक्शन निर्मित ‘नटरंगी नार’ हा लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा कार्यक्रम रंगणार आहे. त्यानंतर रात्री ८.३० वाजता संतोष पवार यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘यदाकदाचित’ या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. १८ एप्रिल रोजी याच मुख्य रंगमंचावर सायंकाळी ७ वाजता पौर्णिमा नगरकर यांचा पारंपारिक लावणीचा कार्यक्रम होणार आहे. तर १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता भाग्यश्री प्रॉडक्शन निर्मित ‘लावण्यखणी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून रात्री ८.३० वाजता ‘के दिल अभी भरा नही’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. २० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता याच रंगमंचावर झाडीपट्टी रंगभूमीवरील ‘घायाळ मी माऊली’ हे नाटक सादर होणार असून त्यानंतर रात्री ८.३० वाजता दिलीप प्रभावळकर लिखीत ‘हसवाफसवी’ या लोकप्रिय नाटकाचे सादरीकरण होणार आहे.
२१ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाट्यसंमेलनाचे उद्घाटन होणार असून या सोहळ्यानंतर रात्री ८.३० वाजता तुळजाभवानी मुख्य रंगमंचावर पु. ल. देशपांडे लिखीत ‘तुझं आहे तुझपाशी’ हे नाटक सादर होणार आहे. २१ एप्रिल रोजीच दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात रमेश भाटकर यांची प्रमुख भूमिका असलेले ‘षडयंत्र’ नाटक सादर होणार आहे.
२२ एप्रिल रोजीही दिवसभर नाट्यरसिकांसाठी कार्यक्रमांची जंगी मेजवानी आहे. या दिवशी सकाळी १० ते १ या वेळेत श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावरील मुख्य रंगमंचावर स्थानिक कलाकारांच्या लोककलांचे सादरीकरण होणार आहे. याच रंगमंचावर सायंकाळी ६ वाजता पद्मश्री विजय कदम यांची प्रमुख भूमिका असलेले ‘खुमखुमी’ हे नाटक सादर होणार आहे. तर रात्री ८ वाजता ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ हा विनोदी कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान २२ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहातही विविध दर्जेदार एकांकिका सादर होणार आहेत. या रंगमंचावर सकाळी १० वाजता नाट्य परिषद, सोलापूर उपनगर शाखेच्यावतीने ‘हमसफर’ ही एकांकिका सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता या रंगमंचावर ‘मायिक’ या एकांकिकेचे सादरीकरण होणार असून दुपारी १२ वाजता नाट्यपरिषद, बीड शाखेच्यावतीने ‘उचल’ ही एकांकिका सादर करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता नाट्य परिषद, सोलापूर उपनगर शाखेच्यावतीने ‘दर्द कोरा’ ही एकांकिका, दुपारी ४ वाजता नाट्यपरिषद, ठाणे शाखेच्यावतीने ‘अशी मी, अशी मी’, दुपारी ४.३५ वाजता नाट्यपरिषद, नाशिक शाखेच्यावतीने ‘स्किट’ ही एकांकिका सादर होणार असून सायंकाळी ५ वाजता या रंगमंचावर नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. अमित भंडारी हे सावरकर यांची मुलाखत घेणार आहेत. त्यानंतर रात्री ६.२० वाजता नाट्य परिषद, कल्याण शाखेच्यावतीने ‘विनोदी प्रहसन (स्किट)’ सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री ६.५० वाजता नाट्य परिषद, पंढरपूर शाखेच्यावतीने ‘प्रहसन’ आणि रात्री ७.४० वाजता अनिहा प्रॉडक्शन निर्मित ‘अंधारातील स्वगत’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. २२ एप्रिल रोजी नाट्यसंमेलनाच्या रा. प. महाविद्यालयातील रंगमंचावर सकाळी १० वाजल्यापासून एकपात्री महोत्सव सुरु होणार असून सायंकाळी ९ वाजता या रंगमंचावर अंबाजोगाई शाखेच्यावतीने ‘गोंधळ’ व ‘लळित’ सादर केले जाणार आहे.
२३ एप्रिल रोजी जिल्हा क्रीडा संकुलावरील मुख्य रंगमंचासह छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह आणि रा. प. परमहंस महाविद्यालय येथील रंगमंचावर स्थानिक कलाकार लोककलांचे सादरीकरण करणार असून यामध्ये स्थानिक शाखेतील कलाकारांचाही समावेश असणार आहे. सायंकाळी ५ वाजता जिल्हा क्रीडा संकुलावरील मुख्य रंगमंचावर खुले अधिवेशन आणि नाट्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे. आठ दिवस चालणार्या या कार्यक्रमांसाठी जिल्हाभरातील रसिकश्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर, निमंत्रक धनंजय शिंगाडे, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आणि नाट्य परिषदेचे स्थानिक शाखेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी केले
COMMENTS