कर्नाटक सरकारने ‘जय महाराष्ट्र’ घोषणेवर बंदी घातल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले होते. त्या वादानंतर आता राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहिले जाणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. ते पुण्यात एसटीच्या विभागीय कार्यालयावर बसविण्यात आलेल्या सौर उर्जा पॅनलच्या उद्घाटनावेळी बोलत होते.
कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी कुठल्याही लोकप्रतिनिधींनी यापुढे ‘जय महाराष्ट्र’ ही घोषणा दिल्यास त्याचे पद रद्द करण्याचा इशारा कर्नाटक सरकारने दिला आहे. कर्नाटक सरकारच्या या निर्णयामुळे सीमा भागासह महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. कर्नाटक सरकारच्या या निर्णयाविरोधात शुक्रवारी बेळगावातील मराठी भाषिकांनी मोर्चा काढला होता. यामध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या रावते यांना पोलिसांनी रोखले होते. त्याविषयी रावते यांना विचारणा केली असता यापुढे राज्यातील बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी नगरसेवकांनी भविष्यात कर्नाटक विरोधात घोषणा देऊ नयेत. महाराष्ट्र राज्याचा जयघोष करू नये व त्यांनी काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी होऊ नये यासाठीचा कायदा दुरूस्तीचा निर्णय घेतल्यानंतर ‘जय महाराष्ट्र’ घोषणेवर बंदी घातल्याचे बेग यांनी सांगितले होते. लोकप्रतिनिधींनी यापुढे ‘जय महाराष्ट्र’ ही घोषणा दिल्यास त्याचे पद रद्द करण्याचा इशारा कर्नाटक सरकारने दिला आहे.
COMMENTS