एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ

एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत यासंदर्भातील घोषणा केली. त्यामुळे एक लाख दहा हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे. त्यानुसार आता कनिष्ठ वेतनश्रेणीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी पाचशे रूपयांची वाढ होणार आहे.

रखडलेल्या वेतन करारामुळे एसटी महामंडळातील कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. कामगारांचे वेतन निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने अद्याप अहवाल सादर केला नसल्याने गेल्या वर्षी होणारा कामगार वेतन करार प्रत्यक्षात येऊ शकला नव्हता. त्यातच एसटी कामगार संघटनांनी सहाव्या व सातव्या वेतन आयोगाच्या तोडीस तोड वेतनाची मागणी लावून धरली होती. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन तुलनेने कमी आहे. त्यामुळे चालकांच्या भरतीला मिळालेला प्रतिसादही कमी होता.

सध्या एसटीतील चालक-वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांचे सरासरी वेतन 12600 रुपये एवढे आहे. यात सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वाढ झाली असती, तर त्यांचे वेतन 18 हजार रुपयांपर्यंत पोहोचले असते. भविष्यातील सातव्या वेतन आयोगाची शक्यता लक्षात घेता हा आकडा 27 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.

 

COMMENTS