ऐका हो ऐका…… आपली मुंबई हागणदारीमुक्त झालीय !

ऐका हो ऐका…… आपली मुंबई हागणदारीमुक्त झालीय !

मुंबईत तुम्ही कुठेही जा एकही व्यक्ती तुम्हाला उघड्यावर शौचास बसलेला दिसणार नाही. मग तुम्ही सकाळी ट्रेन ने प्रवास करत असाल तर ट्रॅकच्या आजूबाजुला तुम्हाला शौचास बसलेला एकही व्यक्ती दिसणार नाही. तुम्ही वडाळा असेल, मुलुंड असेल किंवा मुंबईतला कुठालाही भाग असेल, तुम्हाला कुठेही एकही व्यक्ती उघड्यावर शौचास बसलेला दिसणार नाही. हे आम्ही नाही सांगत. हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल ना !  मात्र हे खरं आहे. कारण दिल्लीतले कारभारी सांगतायेत मुंबई हागणदारीमुक्त झालीय. तसं प्रशस्तीपत्रकही त्यांनी मुंबई महापालिकेला दिलं आहे. हे वाचून मुंबईकरांना हसावं की रडावं असं झालं असेल… आणि आम्हालाही तसंच झालं आहे.

केंद्र सरकारनं प्रशस्तीपत्रक दिलं खरं पण खरचं मुबंई हागणदारीमुक्त झालीय का ?  सर्वसामान्य मुंबईकरांना हाच प्रश्न पडलाय. कारण आजही मुंबईतल्या कुठल्याही भागात जा. किंवा रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला सकाळी उघड्यावर शौचास बसलेले अनेक जण दिसतात. एवढच नाही तर मुंबई महापालिकेनं उघड्यावर बसलेल्या शेकडो लोकांवर गेल्या 15 दिवसांत कारवाई केली आहे. काल महापौर आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही सांगितलं की मुंबई हागणदारीमुक्त झाली नाही. मग केंद्र सरकारनं मुंबई हागणदारीमुक्त झाल्याचं प्रशस्तीपत्रक दिलचं कसं ? असा प्रश्न मुंबईकरांच्या मनात घोळत आहे.

COMMENTS