मुंबई – आझाद मैदानावर मराठा समाजाच्यावतीने विविध मागण्यांसाठी आज मराठा क्रांती मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी या मागण्यांचे निवेदन घेऊन मोर्चाचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले. यावर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात मराठा समाजास ओबीसी समाजाप्रमाणे आरक्षण देण्यास अनुकूलता दर्शवली आहे. याबरोबरच मराठा समाजाच्या इतर मागण्याही मान्य करण्याबाबत सकारात्मक भूमिका सभागृहात स्पष्ट केली.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून मराठ्यांनी आझाद मैदानावर क्रांती मोर्चा पार पाडला. या मोर्चातील विविध मागण्यांसाठी मराठा समाजातील सहा मुलींचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळास मराठा समाजास ओबीसीप्रमाणे आरक्षण देण्यास अनुकूलता दर्शवली. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा मागासवर्गीय आयोगाकडे प्रलंबित आहे. त्यांना शासनाकडून विनंती करून हे आरक्षण लवकरात लवकर लागू करण्याची माहिती सभागृहात दिली. तसेच मराठा कुणबी जात प्रमाणपत्रातील त्रुटी लवकरच दूर करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
याचबरोबर मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह उभारण्याची घोषणा केली. यासाठी प्रत्येत जिल्ह्याला 5 कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केली. तसेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी एकूण 605 कोर्सेसना शिष्यवृती देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याचबरोबर मराठा विद्यार्थ्यांना ६ लाखांच्या ईबीसी मार्यादेसाठी60 टक्के गुणांची अट 50 टक्के करण्यात येणार आहे. तसेच 3 लाख मराठा मुलांना कौशल्य प्रशिक्षण देणार, असल्याची माहिती यावेळी दिली.
कोपर्डी बलात्कार व खून प्रकरणाबाबत मराठा मोर्चाने केलेल्या मागण्यांवर मुख्यमंत्री म्हणाले की, कोपर्डीचा खटला अंतिम टप्प्यात आला आहे, त्याबाबत लवकरच निर्णय लागेल. यासाठी सरकारी वकील उज्वल निकम प्रयत्न करत आहेत. तसेत त्या आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी लवकरच अंतिम सुनावणी सुरू होईल. यासाठी सरकारकडून कसलाही उशीर होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
COMMENTS