कल्याण- डोंबिवली महापालिकेतील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सभागृहाचे संपूर्ण छत कोसळण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी सभागृहाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या सभागृहाचे उद्घाटन होऊन आज बरोबर 15 वर्षे पूर्ण होत असतानाच हा प्रकार घडल्याने महापालिका इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. काही महिन्यांपूर्वी या छतातून पावसाच्या पाण्याची गळती सुरू होती. त्यासाठी तात्पुरती दुरुस्तीही करण्यात आली. मात्र या तात्पुरत्या दुरुस्तीनेच नेमका घात केला असं बोलल्यास वावगं ठरणार नाही. त्याच्या परिणाम म्हणून काल (दि.11)रात्रीच्या सुमारास या सभागृहाचे संपूर्ण छत कोसळले. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने आणि कोणतीही सभा सुरू नसल्याने कोणाला दुखापत झाली नाही. महासभा सुरू असताना हा प्रकार घडला असता तर मोठा अनर्थ घडला असता. तसेच आज कल्याण डोंबिवली महापालिकेत आलेल्या विधिमंडळ कल्याण समितीची बैठकही या सभागृहात होणार होती.
दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर महापौर राजेंद्र देवळेकर, उपमहापौर मोरेश्वर भोईर, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी सभागृहाची पाहणी केली. या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिले आहेत.
COMMENTS