काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेश प्रतिनिधिंच्या बैठकीत “हे” दोन महत्वाचे ठराव झाले मंजूर !

काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेश प्रतिनिधिंच्या बैठकीत “हे” दोन महत्वाचे ठराव झाले मंजूर !

मुंबई – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संघटनात्मक निवडणुका शांततेत पार पडल्या असून आज नवनियुक्त प्रदेश प्रतिनिधींची बैठक प्रदेश निवडणूक अधिकारी डॉ. महेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन येथे पार पाडली. काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी असा ठराव सर्वानुमते या बैठकीत मंजूर करण्यात आला अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली.

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या 553 व मुंबई काँग्रेसच्या 227 नवनियुक्त प्रदेश प्रतिनिधींची बैठक प्रदेश निवडणूक अधिकारी माजी खासदार डॉ. महेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रांताध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, सुशीलकुमार शिंदे,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, विलास मुत्तेमवार मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या उपस्थितीत पार पडली.

या बैठकीत काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी असा ठराव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण  व मुंबई काँग्रेस तर्फे संजय निरूपम यांनी मांडला या ठरावाला सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण माणिकराव ठाकरे, दुसेन दलवाई, नसीम खान, रजनी पाटील, एकनाथ गायकवाड, कृपाशंकर सिंह, विश्वजीत कदम विलास मुत्तेमवार वसंत पुरके यांनी अनुमोदन दिले आणि हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, मुंबई काँग्रेस अध्यक्ष व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी व जिल्हाध्यक्षांच्या निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना देण्याचा ठराव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मांडला या ठरावाला राधाकृष्ण विखे पाटील, शरद रणपिसे, चरणसिंग सप्रा यांनी अनुमोदन दिले आणि हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

संघटनात्मक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली अशी माहिती देऊन प्रदेश निवडणूक अधिकारी डॉ. महेश जोशी यांनी सर्व नवनियुक्त प्रदेश प्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या.

COMMENTS