कांदा निर्यातीस 3 महिन्यांची मुदतवाढ मिळावी, सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

कांदा निर्यातीस 3 महिन्यांची मुदतवाढ मिळावी, सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा  राज्यात 25 टक्यांनी वाढलेले कांदा उत्पादन आणि अन्य राज्यातही विक्रमी कांदा उत्पादन झाल्यामुळे दर कमी झाले आहेत. कांदा उत्पादक शेतक-यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र शासनाने कांदा निर्यातीला तीन महिन्यांपर्यंत मुदत वाढ द्यावी, अशी मागणी  सुधीर  मुनगंटीवार यांनी केंद्रीय वित्तमंत्री अरूण जेटली यांना केली. या मागणीबद्दल जेटली यांनी सकारात्मकता दर्शविली आहे.

महाराष्ट्राचे वित्तमंत्री सुधीर  मुनगंटीवार यांनी नॉर्थ ब्लॉक येथे केंद्रीय वित्तमंत्री अरूण जेटली यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरेही उपस्थित होते.

अग्रीम निधी न भरण्याची सवलत मिळावी

राज्य शासनाने शेतक-यांचे कर्जमाफ करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’  सुरू केली आहे. राज्य शासनाने याकरिता आर्थिक तरतूदीचे नियोजन  केलेले आहे. राज्यशासन महागडे व्याजदर असणारे कर्ज फेडत आहे. असे कर्ज फेडतांना राज्यशासनाला अग्रीम रक्कम भरावी लागते, हा अग्रीम निधी न भरण्याची राज्य शासनाला सवलत मिळावी, त्यामुळे राज्यशासनाला दरवर्षी 3 ते 4 हजार कोटी रूपयांची बचत करता येईल. खुल्या बाजारातून कर्ज उपलब्धतेची मर्यादा 15 हजार कोटीपर्यंत करण्यात यावी, अशी मागणीही सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली.

 

COMMENTS