सायन रुग्णालय मारहाण घटनेविरोधात राज्यभरातील डॉक्टरांनी सामुहिक संप पुकारल्याने रुग्णांचे आतोनात हाल झाले आहेत. त्यामुळे जर संध्याकाळपर्यंत डॉक्टर कामावर रुजू झाले नाहीत तर नियमानुसार त्यांच्यावर कारवाईचा इशारा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिला आहे.
विविध प्रश्नांना घेऊन निवासी डॉक्टर आणि महापौर यांच्यातील बैठक नुकतीच संपली. या बैठकीत डॉक्टरांच्या काही मागण्या मान्य झाल्या, मात्र तरीही ही बैठक निष्फळ ठरली. बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने डॉक्टरांनी सामूहिक रजा मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या सायन रुग्णालयात शनिवारी रेखा सिंह यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टर रोहित कुमार यांना मारहाण केली. या मारहाणीच्या निषेधार्थ राज्यभरातील सर्व निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेले.
महापौरांसोबतच्या बैठकीत निवासी डॉक्टरांच्या काही मागण्यांना तात्काळ मंजुरी देण्यात आली. तरीही डॉक्टरांनी सामूहिक रजेचा पवित्रा कायम ठेवल्यामुळं रुग्णाचे प्रचंड हाल होत आहेत.
डॉक्टरांचा मागण्या मान्य
महापौरांसोबतच्या बैठकीत डॉक्टरांच्या काही मागण्या तातडीने मान्य करण्यात आल्या.
केवळ 2 नातेवाईकांना पेशंटसोबत प्रवेश दिला जावा.
हॉस्पिटलमध्ये अलार्म सिस्टीम लावण्यात यावी (ही मागणी बैठकीतच तात्काळ मंजूर करण्यात आली)
यासोबत हॉस्पिटलमध्ये पास सिस्टीमही लागू करण्यात येणार आहे.
मुंबई महापालिका प्रशासन डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांची संख्या वाढवणार
सध्या 432 सुरक्षारक्षक सर्व महापालिका हॉस्पिटलमध्ये मिळून आहेत.
यात वाढ करुन शनिवारी 400 पोलिसांची नेमणूक करणार, तर, नंतर ही संख्या 700 पर्यंत वाढवणार.
मार्डच्या डॉक्टरांच्या नेमक्या मागण्या काय?
डॉक्टरांवरील हल्ले टळण्यासाठी डॉक्टर्स प्रोटेक्शन अॅक्ट 2010 ची परिणामकारक अंमलबजावणी करा
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी
निवासी डॉक्टरांना सुरक्षीत वातावरणात काम करता यावे यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा
सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावा.
COMMENTS