कार्ती चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही

कार्ती चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांना भ्रष्टाचार प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. कार्ती चिदंबरम यांना विदेशात जाण्यावर बंदी कायम ठेवण्यात आली असून याप्रकरणी दुसरे आरोपी रवी विश्वनाथन यांना सुद्धा दिलासा मिळाला नाही. 15 दिवस विदेशात जाण्याची मागणी फेटाळून लावण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी दुपारी दोन वाजता होणार आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयही (ईडी) मनी लाँड्रिंगप्रकरणी कार्ती यांच्यासह आयएनएक्स मीडियावर एफआयआर दाखल केला होता. या दोघांवर विदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळाकडून (एफआयपीबी) मंजुरी मिळवून विदेशी गुंतवणूक मिळवण्यासाठी कथित गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. सीबीआयनेही कार्ती चिदंबरम आणि आयएनएक्स मीडियाविरोधात एफआयआर दाखल केला होता. पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडिया या कंपनीला 2007मध्ये नियमापेक्षा अधिक विदेशी गुंतवणूक मिळवून दिल्याचा आरोप यांच्यावर आहे. कंपनीला फक्त 4.62 कोटींची विदेश गुंतवणूक करण्याची परवानगी असताना त्यांनी 305 कोटी रुपये उभे केले होते. कार्ती चिदंबरम यांनी आपल्या वडिलांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही लावण्यात आला होता.

COMMENTS