ज्येष्ठ शास्त्रीय गायिका ‘गानसरस्वती’ किशोरी आमोणकर यांचं सोमवारी रात्री 9.30 निधन झालं. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत रवींद्र नाट्यमंदिर संकुलात अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. किशोरीताईंच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.
‘किशोरीताई आमोणकर यांच्या निधनाने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील विशुद्ध सूर हरपला. किशोरीताईंच्या सुरांचा मी स्वतः एक निःसीम चाहता, त्यामुळे किशोरीताईंच्या जाण्याने संगीत रसिकांना झालेल्या दुःखाची व भारतीय शास्त्रीय संगीतक्षेत्रात निर्माण झालेल्या पोकळीची कल्पना येऊ शकते.’ अशा शब्दात शरद पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
10 एप्रिल 1931 रोजी मुंबईमध्ये किशोरी आमोणकर यांचा जन्म झाला. सुप्रसिद्ध गायिका मोगूबाई कुर्डीकर आणि माधवदास भाटिया यांच्या त्या कन्या. आईकडूनच संगीताचे बाळकडू घेतलेल्या किशोरी आमोणकर यांनी पुढे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका म्हणून राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय स्तरावर आपली स्वत:ची ओळख निर्माण केली.
किशोरी आमोणकर या जयपूर घराण्याच्या शैलीत गायन करत असत. गायन क्षेत्रातील त्यांच्या भरीव कामगिरीमुळे त्यांना ‘गानसरस्वती’ असे म्हटले जाते.
किशोरी आमोणकर यांनी 1950 च्या सुमारास आपल्या व्यावसायिक कारकीर्दीस प्रारंभ केला. हिंदी चित्रपट ‘गीत गाया पत्थरोंने’ (1864) साठी त्यांनी सर्वप्रथम पार्श्वगायन केले आहे. 1991 मध्ये प्रसारित झालेल्या ‘दृष्टी’ ह्या हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. किशोरीताई त्यांच्या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध होत्या.
ख्याल गायकी, ठुमरी, भजन या गायन प्रकारात त्यांचा हातखंडा होता. किशोरीताईंचे गाणे हे कायमच रसिकांच्या हृदयाचा ठाव घेत असे. त्यांनी ‘स्वरार्थरमणी – रागरससिद्धान्त’ हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ लिहिला आहे.
किशोरी आमोणकर यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान
संगीत नाटक अकादमी पुरस्कार – 1985
पद्मभूषण पुरस्कार – 1987
संगीत सम्राज्ञी पुरस्कार – 1997
पद्मविभूषण पुरस्कार – 2002
संगीत संशोधन अकादमी पुरस्कार – 2002
संगीत नाटक अकादमी फेलोशिप – 2009
COMMENTS