कुठलेही बटन दाबा, कमळाचीच पावती, सोशल मीडियातील व्हिडिओमुळे पुन्हा संशय

कुठलेही बटन दाबा, कमळाचीच पावती, सोशल मीडियातील व्हिडिओमुळे पुन्हा संशय

भोपाळ – मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या मतदान यंत्राच्या चाचणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पुन्हा एकदा (ईव्हीएम) इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिनविषयी संशय निर्माण झालाय. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर दोन मोठ्या अधिका-यांच्या बदल्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मध्ये प्रदेशातील अतेर (जि. भींड), उमरिया (जि. बांधवगड) जागांसाठी येत्या 9 एप्रिलला पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. त्यासाठी मतदानयंत्राची नक्कलप्रत चाचणी घेण्यात आली. मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकारी सलीना सिंग यांच्या समक्षच ही चाचणी झाली. यावेळी कोणतेही बटन दाबले तरी भारतीय जनता पक्षालाच मतदान केले जात होते. दरम्यान या प्रकाराचा व्हिडीयो सोशल मिडीयावर व्हायरल झाला. स्वतः सलीन सिंग यांनी नंतर पत्रकार परिषदेत या वृत्ताचे खंडन केले. त्यातच या मतदारसंघातील दोन बड्या अधिकाऱ्यांच्या सरकारने तत्काळ बदल्या केल्या. त्यामुळे मतदानयंत्रामध्ये घोळ  आहे असा आरोप करणाऱ्या आम आदमी पक्ष व काँग्रेस यांच्या आरोपाला बळ मिळाले आहे.  दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मतदानयंत्रांच्या विश्वासार्हतेवर पुन्हा शंका व्यक्त केली. पाच राज्यांतील  निवडणुकांत मतदानयंत्रांमध्ये मोठा घोळ करण्यात आल्याने भारतीय जनता पक्षास यश मिळाले, असा आरोप या पक्षांनी त्यावेळी केला होताच, त्यास मध्य प्रदेशातील प्रकाराने बळ मिळाले. भाजपने मात्र ‘निवडणूक आयोगावर, मतदानयंत्रांवर आमचा पूर्ण विश्वास आहे’, असे म्हटले आहे.

चाचणी यंत्राचे काम योग्य रीतीने पार पडल्याचे मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकारी सलीना सिंग यांनी सांगितले असताना, या प्रकरणी मध्य प्रदेश सरकारने भिंडचे जिल्हाधिकारी इलयराजा, तसेच पोलीस अधिक्षक यांची बदली केली. आणखी १९ जणांवरही सरकारने कारवाई सुरू केली आहे. इलयराजा हे कर्तव्यकठोर व सचोटीचे अधिकारी असून, त्यांना हटविल्याने भिंड जिल्ह्य़ातील नागरिक संतापले आहेत. या प्रकरणी निवडणूक आयोगाने भिंड जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला असून, मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी उच्चस्तरीय समितीही तेथे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

COMMENTS