कुलभूषण जाधव यांच्या फाशीचे  काश्‍मीर  नेत्यांकडून समर्थन

कुलभूषण जाधव यांच्या फाशीचे काश्‍मीर नेत्यांकडून समर्थन

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील  रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच या फाशीचे काश्‍मीरमधील एका नेत्याने समर्थन केले आहे. पाकिस्तानने फक्त कायद्याचे पालन केले असे सांगत या नेत्याने पाकचे समर्थन केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानातील लष्करी न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त होत आहे. संसदेतही सर्वपक्षीय खासदारांनी यावर रोष व्यक्त केला. पण जम्मू काश्‍मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे नेते मुस्तफा कमाल यांनी थेट पाकिस्तानचे समर्थन करत नवा वाद निर्माण केला.

मुस्तफा कमाल यांनी हे विधान एका वृत्तसंस्थेशी बोलताना केले. कमाल म्हणाले, पाकिस्तानने फक्त नियमाचे पालन केले आहे. सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असलेल्या भारताने यावर शंका उपस्थित करणे योग्य नाही असे त्यांनी म्हटले आहे. कमाल यांच्या विधानावर नॅशनल कॉन्फरन्सकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. कमाल यांचे विधान ही पक्षाची भूमिका आहे का असा प्रश्न आता विरोधकांकडून उपस्थित होत आहे.

दरम्यान, पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेविषयी प्रतिक्रिया देणे टाळले आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसूरी यांना पत्रकारांनी कुलभूषण जाधव यांच्याविषयी प्रश्न विचारला. पण यावर उत्तर न देताच कसूरी यांनी तिथून काढता पाय घेतला.

 

COMMENTS