कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – राजनाथ सिंह

कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – राजनाथ सिंह

नवी दिल्ली – पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे तीव्र पडसाद आज संसदेत उमटत आहेत. पाकिस्तानने फाशी शिक्षा सुनावलेल्या कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार सर्व मार्गांचा वापर करणार आहे. जाधव यांना न्याय मिळवून देणारच, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली आहे. कुलभूषण जाधव जर भारतीय हेर असेल तर त्याच्याकडे अधिकृत भारतीय व्हिसा कसा असेल, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पाकिस्तानचा दावा फेटाळून लावला आहे.

कुलभूषण जाधव हेरगिरी करत असल्याचा ठोस पुरावा पाकिस्तानला मिळू शकला नाही. यानंतरही सोमवारी पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. जाधव यांना शिक्षा सुनावल्याचा मुद्दा काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी लोकसभेत उपस्थित केला होता. यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सरकारची भूमिका मांडली. कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे राजनाथ सिंह म्हणाले.

 

काय आहे प्रकरण?

हेरगिरीच्या संशयावरुन भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली आहे. कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात अटक करण्यात आली. जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानने केलेले सर्व आरोप फेटाळले असून जाधव हे आपल्या व्यवसायानिमित्त पाकिस्तानमध्ये असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला होता. कुलभूषण जाधव मूळचे मुंबईचे रहिवासी असून त्यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत.
जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव परिवाराने फेटाळून लावला आहे.

 

दरम्यान, ‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटकेत असलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना सोमवारी 10 एप्रिलला पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.  रावळपिंडी कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

 

COMMENTS