कोल्हापूर महापालिकेत राडा, सत्ताधारी-विरोधक भिडले

कोल्हापूर महापालिकेत राडा, सत्ताधारी-विरोधक भिडले

कोल्हापूर – आज कोल्हापूर महानगरपालिकेत रस्ते हस्तांतरण विषयावरुन सत्ताधारी विरोधक एकमेकांना भिडले. दारू दुकानांच्या परवानगी मिळावी यासाठी रस्ते हस्तांतर करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक आमने -सामने आले. आज रस्ते हस्तांतर ठरावावरून महापालिका सभेत प्रचंड गोंधळ सुरु झाल्याने सभा अर्धा तास तहकूब करण्यात आली आहे. महापौर फरास सभेतून उठून गेल्या.

सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यावरील दारू विक्रीची दुकाने, बिअरबार 500 मीटर अंतरावर न्यावेत असा आदेश दिला आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांनी हे रस्ते आपल्या अधिकारांतर्गत घेण्याची तयारी सुरू केली आहे.

दरम्यान, रस्ते हस्तांतराचा ठरावाला विरोध करण्यासाठी दि. 21 एप्रिल रोजी आपचे पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या महापौर हसिना फरास यांना भेटले होते. त्यांनी महापालिकेकडे रस्ते हस्तांतरण प्रक्रिया होणार नाही, तसा ठरावही केला जाणार नाही, असे आवासन दिले होते.

मात्र आज(मंगळवारी) होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये रस्ते हस्तांतर प्रक्रियेचा ठराव मंजूर करणार असल्याची माहिती आप कार्यकर्त्यांना मिळाली होती. म्हणून सोमवारी (दि.19) दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी रस्ते हस्तांतराचा ठराव कोल्हापूर महापालिकेत करू नये अशी मागणी करण्यासाठी गेलेले आपचे जिल्हाध्यक्ष भगवान पवार, संदीप देसाई, उत्तम पाटील यांना महापौरांचे सुपूत्र व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश सरचिटणीस आदिल फरास व त्याच्या समर्थकांमध्ये महापौर दालनात  बाचाबाची झाली. त्यांच्याकडील निवेदनाच्या प्रती फाडून टाकण्यात आली होती.

COMMENTS