मुंबई – एकीकडे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करुन यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली आहे. याबरोबरच खडसे यांना एक न्याय, मेहता यांना एक न्याय, खडसे उपाशी, मेहता तुपाशी आशा घोषणा देत विरोधकांनी खडसे यांच्या बाबतीत सहानुभूती दाखवली आहे.
मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांचा गोंधळ वाढल्याने विधानसभेत कामकाज ३ वेळा तहकूब करण्यात आले. प्रकाश मेहता मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे व एमएसआरडीएचे संचालक राधेश्याम मोपलवार यांना निलंबित करावे, अशी मागणी केली. त्यावर विरोधी पक्षांची चर्चेची मागणी अमान्य करत तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी प्रश्नोत्तरांचा तास पुकारला. त्याविरोधात विरोधीबाकावरून हरकत घेत घोषणाबाजी सुरू केली. विरोधकांनी वेलमध्ये उतरून सरकारविरोधी घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावेळी विरोधकांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या बाजूने घोषणाबाजी केली. खडसे यांच्या बाजूने घोषणा सुरू असताना सत्ताधारी आमदारही अचंबित झाले. मात्र यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात उपस्थित नव्हते. प्रकाश मेहता यांचे नवे प्रकरण आम्ही सादर करतो. भ्रष्टाचाराला पाठिशी घालण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री करत आहेत. हे गंभीर आहे, असे जयंत पाटील यांनी यावेळी म्हटले. प्रकाश मेहतांच्या संबंधीत दोन नवी प्रकरणे विरोधकांनी समोर आणली आहेत. स्वत: मेहतांनी सांगितले की, “मी मुख्यमंत्र्यांना अवगत केले नव्हते.” मग त्यांना का पाठिशी घालताय ? जसे मोपलवारांना पदापासून दूर केले तसे प्रकाश मेहतांना पदावरून बाजूला करा, असे अजित पवार यांनी सभागृहात सांगितले. मंत्री पदावर असताना मुख्यमंत्री कशी चौकशी करणार? असा सवालही पवार यांनी यावेळी केला.
प्रश्नोत्तराच्या तासातच हा गोंधळ सुरू होता. यावर संसदीय कार्यमंत्री यांनी परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. “तुम्हाला काय सांगायचय ते प्रश्नोत्तराच्या तासानंतर संधी दिली जाईल तेव्हा सांगा,” असे सांगत प्रश्नोत्तरांचे तास सुरूच ठेवण्याची विनंती बापट यांनी तालिका अध्यक्षांना केली. त्यामुळे चिडलेले विरोधक पुन्हा वेलमध्ये उतरले. विरोधकांनी पुन्हा सरकारविरोधी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. भ्रष्टाचारी मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, भ्रष्टाचारी मंत्र्याला पाठिशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, गलीगली में शोर है भाजप सरकार चोर है, खडसे साहेबांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. अशा घोषणा देत अध्यक्षांच्या जागेवर जाण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला.
COMMENTS