सत्तेसाठी गोव्यात जी राजकीय धुळवड खेळली गेली तो लोकशाहीचा खूनच आहे. गोव्यात असे खून अनेकदा झाल्यानं आता त्यात आणखी एका खुनाची भर पडली आहे,’ असं सांगतानाच,’ असे खून पचवायची शक्ती आमच्या लोकशाहीला मिळो,’ अशा उपरोधिक शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोव्यातील सत्तास्पर्धेवर भाष्य केलं आहे.
गोव्यात 17 जागा जिंकूनही काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नाही. अवघ्या 13 जागा मिळवलेल्या भाजपनं छोटो पक्ष आणि अपक्षांच्या मदतीनं सत्तेचा सोपान चढण्याचा पराक्रम केला आहे. गोव्यातील निवडणुकीत भाजपची ही चलाख राजकीय खेळी शिवसेनेला भलतीच झोंबल्याचं दिसत आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना शुभेच्छा देताना लोकशाहीच्या खुनाचा दाखला देत भाजपवर खोचक टीका केली आहे.
गोव्यातील धुळवड या मथळ्याखाल शिवसेनेचे मुखपत्र समजल्या जाणाऱ्या दै. सामनात लिहीलेल्या लेखातुन भाजप आणि गोव्यातील सत्तासंघर्षावर जोरदार टीका केली आहे. उत्तर प्रदेशात भाजपला मिळालेल्या मोठ्या यशावर भाजपच्या मंडळींना टोचणी देत, स्वातंत्र्यानंतर मोदींइतका लोकप्रिय नेता झाला नाही, असे भाजप नेत्यांचे आता सांगणे आहे. विजयाचा गुलाल आसमंतात उधळला असल्याने त्यांचे हे सांगणे मान्य करावेच लागेल, पण उत्तर प्रदेशबरोबर गोवा, मणिपूर, पंजाबसारख्या राज्यांत निवडणुका झाल्या व तिथेही निकाल लागले आहेत. ते निकाल पूर्णपणे वेगळे आहेत. मात्र त्या निकालांवर कोणी राजकीय पंडित बोलायला तयार नाहीत. खरे तर त्यावरही भाष्य व्हायला हवे. ही राज्ये उत्तर प्रदेशच्या तुलनेत लहान असली तरी तेथील मतदारांनी दिलेला कौल हीदेखील लोकभावनाच आहे. त्यामुळे निवडणूक निकालांचे विश्लेषण सर्वव्यापी व्हायलाच हवे, असे लेखात म्हटले आहे.
COMMENTS