मुंबई: गणेशोत्सवाच्यानिमित्ताने कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान टोलमधून सूट देण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी केली. यादरम्यान गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांकरीता स्टिकर्स देण्यात येणार असून हे स्टिकर्स पोलीस स्टेशन तसेच, आर.टी.ओ. कार्यालयात गणेशभक्तांना 17 ऑगस्टपासून उपलब्ध होतील, असे एकनाथ शिंदे म्हणाले. या स्टिकर्समुळे मुंबई एन्ट्री पॉईंटवरील टोलनाके, मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरील नाके तसेच खेड-शिवापूर, आणेवाडी, तासवडे आणि किणी अशा सर्व टोल नाक्यांवर गणेशभक्तांना टोलमधून सूट मिळणार असून हे स्टिकर्स दाखवून कोकणातून परतताना देखील या वाहनांना टोलमाफी मिळणार असल्याचे शिंदे म्हणाले.
गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी आणि वाहतूक नियंत्रण यासाठी महत्त्वाची बैठक एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पाडली. यावेळी एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक मंडपे, पोलीस उपायुक्त अशोक दुधे तसेच पीडब्लूडी, वाहतूक आदींचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सवात टोलसाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा तसेच, रस्त्यांवरील खड्डे यामुळे वाहतूक कोंडी होत असते. कोकणात जाणाऱ्या सर्व मार्गांवरील खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत, तसेच पोलीस दलासोबतच डेल्टा फोर्स, ट्रॅफिक वार्डन आदी गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी सज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. गणेशोत्सवाच्या कालावधीत लाखो प्रवासी मुंबई सिंधुदुर्ग असा प्रवास या दहा दिवसांत करत असतात. या दिवसात रस्त्यांमध्ये गाड्या बंद पडल्यास होणारा खोळंबा टाळण्यासाठी क्रेन्स तसेच, अपघातजन्य परिस्थिती अँब्युलन्स, क्यूआरव्ही (क्विक रिस्पॉन्स व्हीकल्स) देखील सज्ज ठेवण्याचे निर्देश शिंदे यांनी या बैठकी दरम्यान दिले.
COMMENTS