गायी, म्हशींचा गट वाटप पथदर्शी योजना जालन्यासह बीड, उस्मानाबाद, यवतमाळ जिल्ह्यांत राबविणार !

गायी, म्हशींचा गट वाटप पथदर्शी योजना जालन्यासह बीड, उस्मानाबाद, यवतमाळ जिल्ह्यांत राबविणार !

 

मुंबई – मराठवाडा पॅकेजअंतर्गत पथदर्शी स्वरुपात राबविण्यात येणारी शेळी, गायी आणि म्हशींची गट वाटप योजना जालना जिल्ह्यासह बीड, उस्मानाबाद व यवतमाळ जिल्ह्यांत राबविण्यासह लाभार्थ्यांना देय असलेले अनुदान पहिल्याच वर्षी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कृषीपूरक व्यवसायांना उत्तेजन मिळण्यासह दुग्धोत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.

शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांना 20 शेळ्या अधिक दोन बोकड, दोन देशी किंवा संकरित गायी, तसेच दोन म्हशींचा गट वाटप करण्याची योजना पथदर्शी स्वरुपात 15 ऑक्टोबर 2016 पासून राबविण्यात येत आहे. यात जालना जिल्ह्यातील 8 तालुक्यांचा समावेश असून सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान (Back ended) देण्यात येते. त्यानुसार सुरूवातीला प्रकल्प स्थापनेनंतर पहिल्या वर्षांनंतर 20 टक्के, दुसऱ्या वर्षानंतर 20 टक्के आणि तिसऱ्या वर्षानंतर 10 टक्के याप्रमाणे अनुदान देण्यात येत होते. आज झालेल्या बैठकीत ही योजना जालन्यासह बीड, उस्मानाबाद व यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही राबविण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच अनुदान वितरणाच्या पद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. यानुसार सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान गट स्थापनेच्या पहिल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात 25 टक्के, तर उर्वरित 25 टक्के अनुदान दुसऱ्या सहा महिन्यात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

COMMENTS