गुजरातमधील काँग्रेसचे नेते शंकरसिंह वाघेला यांनी नवा पक्ष काढला आहे. जनविकल्प असं त्यांच्या नव्या पक्षाचं नाव आहे. राज्यातील सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस यांना योग्य पर्याय म्हणून आपला पक्ष पुढे येईल असा विश्वास वाघेला यांनी व्यक्त केलाय. भाजप आणि काँग्रेस यांच्यापासून आपला पक्ष समान अंतर राखेल असंही वाघेला म्हणाले.
गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस हेच आजपर्य़ंतचे मुख्य पक्ष राहिले आहेत. त्यामुळे विधानसभेची निवडणूक या दोन पक्षातच रंगेल अशी शक्यता वर्तविली जात होती. आता मात्र वाघेला यांच्या पक्षामुळे आणखी एक दावेदार गुजरातमध्ये पुढे आला आहे. वाघेला यांनी त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून स्वतःला प्रोजेक्टही केले आहे. तसंच आम आदमी पार्टीही गुजरात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे गुजरातमध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
गुजरातची निवडणुक ही भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. एकतर ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा याचं होम स्टेट आहे. तसंच 2019 च्या सार्वत्रित निवडणुकीची सेमीफायनल म्हणूनही या निवडणुकीकडं पाहिलं जातंय. त्यामुळे भाजपला गुजरात जिंकणं तर आवश्यक आहेच. त्याशिवाय गेल्यावेळीपेक्षा चांगलं यश मिळवावं लागणार आहे. नाहीतर त्याचा विपरीत संदेश देशभर जाण्याची शक्यता आहे.
गुजरातमध्ये भाजपला पटेल आंदोलन, शेतक-यांची नाराजी आणि अँटीइन्मबन्सीचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यावर मात करण्यासाठी भाजपकडून विविध उपाय योजले जात आहे. जर चौरंगी लढत झाली तर सरकारविरोधी नाराजांची मते विभागली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचा फायदा अखेर सत्ताधारी भाजपला होण्याची शक्यता आहे.
COMMENTS