गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे वडील व्हि एन पाटील यांची एका ज्युनिअर कॉलेजच्या कर्मचा-याच्या थोबाडीत मारण्याचा प्रकार समोर आलाय. त्याची मोबाईल क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या प्रकरणी मूर्तीजापूर ग्रामिण पोलिंसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री डॉ. ऱणजित पाटील यांचे घुंगशी हे मूळ गाव आहे. गावात त्यांची शैक्षणिक संस्थाही आहे. त्याच गावात संजय देशमुख यांचीही शैक्षणिक संस्था आहे. त्यांच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरुन गेल्या 15 वर्षांपासून वाद असल्याचं बोललं जातंय. व्हि एन पाटील हे परवा संजय देशमुख यांच्या कॉलेजमध्ये गेले आणि तिथे त्यांची काही कर्मचा-यांची बाचाबाची झाली. त्यानंतर संतापलेल्या पाटील यांनी एका कर्मचा-याच्या थोबाडीत मारली. याचे चित्रण मोबाईलमध्ये करण्यात आले आहे. ते सोशल मीडियातून व्हायरलही झाले आहे. पाटील यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अजून गुन्हा दाखल झालेला नाही. गृहराज्यमंत्र्यांचेच वडील असल्यामुळे आता पोलीस काय कारवाई करतात याकडे पहावं लागेल.
COMMENTS