गोहत्याबंदीचं स्वागत, पण शेतकरी आत्महत्या कशा चालतात ? उद्धव ठाकरेंचा सवाल

गोहत्याबंदीचं स्वागत, पण शेतकरी आत्महत्या कशा चालतात ? उद्धव ठाकरेंचा सवाल

 मुंबई – गुजरात आणि इतर भाजप शासित राज्यांमध्ये गोहत्या बंदीबाबत केलेल्या कडक कायद्याचे स्वागत करत महाराष्ट्रासह इतर राज्यात होणा-या शेतक-यांच्या आत्महत्येवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल चढवलाय. ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या गो मांसाबद्दलच्या दुटप्पी धोरणावर बोट ठेवलं आहे. तसंच, गोहत्या बंदीसाठी हिरीरीनं कायदे करणाऱ्या भाजपला शेतकरी आत्महत्या दिसत नाहीत का, असा सवालही त्यांनी केला आहे.
गोव्यात भाजपचे राज्य आहे, पण तेथील मोठा समाज ‘बीफ’ खातो. गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून फाशी देण्याची भूमिका गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर घेऊ शकतील काय?  ‘भाजपला मत दिले तर ‘बीफ’चा मुबलक पुरवठा मतदारसंघात राहण्याबाबत काळजी घेऊ’’, असे आश्वासन केरळात पोटनिवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या उमेदवाराने दिले आहे. ज्या पक्षाचे नेते गाय मारणाऱ्यांना फासावर लटकवण्याची भाषा करताहेत, त्याच पक्षाचा एक उमेदवार गोमांसाचा पुरवठा त्या मतदारसंघात मुबलक राहील असे आश्वासन देत आहे.  मणिपूर, अरुणाचल प्रदेशातही भाजपचं राज्य आहे. योगी आदित्यनाथ, गुजरात, छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे भाजपनं मणिपूर व अरुणाचलातही गोहत्या आणि ‘बीफ’वर बंदीचा हुकूम बजावायला हवा. गोवंशहत्या बंदीसारख्या संवेदनशील विषयाबाबत याप्रकारे असमान धोरण असेल तर उद्या समान नागरी कायद्याची अंमलबजावणी तरी कशी होणार, असाही प्रश्न जनतेच्या मनात येऊ शकतो.

महाराष्ट्रासारख्या राज्यांमधील शेतकऱ्यांची अवस्था इतकी दारुण झाली आहे की, स्वतःचे पोट भरायचे की पशुधन जगवायचे या विवंचनेत महाराष्ट्राचा शेतकरी आहे. भाकड गोवंशाचे काय करायचे याचेही व्यवहारी उत्तर मिळायलाच हवे. गोवंशहत्या रोखायची असेल तर शेतकऱ्यांना जगवायला हवे, त्याला आर्थिकदृष्ट्या स्वाभिमानी व मजबूत करायला हवे. गोहत्येचे ज्यांना पातक वाटते, त्यांच्या राज्यात शेतकरी आत्महत्या करीत आहे त्याचे काय? अशावेळी शेतकरी आत्महत्या हा सदोष मनुष्यवध मानून कुणाला गुन्हेगार ठरवायचे, कुणाला जन्मठेप ठोठवायची आणि कुणाला फासावर लटकवायचे याबाबत खुलासे व्हायलाच हवेत असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

COMMENTS