राज्यातील पहिला प्रयोग; मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले उद्घाटन
एक मोबाईल कॉल करा. प्रशासनातील अडचणीबाबतची तक्रार रजिस्टर करा… 30 दिवसात कोणतीही समस्या सुटेल. अन्यथा जिल्हाधिकारी आणि गरजेनुसार पालकमंत्री हस्तक्षेप करेल, अशी अभिनव, महाराष्ट्रातील पहिली हेल्पलाईन चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने सुरु केली आहे. राज्याचे वित्त, नियोजन, वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज ही उद्घाटन झाले.
‘ हॅलो चांदा ’ असे या ‘ पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेचे’ नामकरण करण्यात आले आहे. आपल्या अभिनव योजनांसाठी प्रसिध्द असणारे राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा पहिला प्रयोग त्यांचा गृह जिल्हा असणा-या चंद्रपूरमध्ये केला आहे. चंद्रपूर जिल्हयातील 15 तालुक्यातील कोणत्याही सामान्य माणसाला हातातल्या मोबाईलवर प्रशासनाला दाद मागण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. चंद्रपूर सारख्या दुर्गम भागातील जनतेला इंटरनेट सुविधा वापरुन लिखीत सेवा मिळवणे शक्य नव्हते. आता मात्र मोबाईलवरुन कॉल करुन ही सेवा मिळवता येणार आहे. याचा लाभ जिल्हयातील 22 लाख लोकांना होणार असून इंटरनेट सेवा वापरणा-यांसाठी लिखीत तक्रारीचाही पर्याय यामध्ये ठेवला आहे. आज दुपारपासून या यंत्रणेमार्फत जनतेने दाद मागणेही सुरु केले आहे. या प्रयोगासाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी पुढाकार घेतला. महिनाभराच्या अनेक चाचणीनंतर ही सेवा आज सुरु झाली आहे. अशा प्रकारची प्रशासनाला गती देणारी यंत्रणा अल्पावधीत उभारल्याबद्दल पालकमंत्र्यांनी जिल्हाधिका-यांचे अभिनंदन केले आहे.
प्रशासनात काम पुढे ढकलण्याची पध्दत अधिक असल्याचे म्हटले जाते. मात्र चंद्रपूर जिल्हयाच्या प्रशासनाने विक्रमी वेळेत ही यंत्रणा जिल्हयात सुरु करुन ख-या अर्थाने जनतेची ‘ सर्व्हीस ’ सुरु केली असल्याचा आनंद पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. त्यांनी स्वत: हेल्पलाईन क्रमांकावर डायल करुन ही सेवा सुरु केल्याचे जाहीर केले. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल व जिल्हा पोलीस अधीक्षक नियति ठाकर व जिल्हयातील प्रमुख अधिका-यांच्या उपस्थितीत ही सुरुवात करण्यात आली. या पहिल्या प्रयोगाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आज ही सेवा सुरु करतांना पालकमंत्र्यांसोबत व्यासपिठावर वनविकास मंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार नाना शामकुळे, आमदार ॲड.संजय धोटे, महापौर अंजलीताई घोटेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तक्रारीसाठी डायल करा 1800-266-4401
1800-266-4401 या हेल्पलाईन क्रमांकावरुन जिल्हयातील नागरिकांना आता चंद्रपूर जिल्हयातच एखादया शासकीय विभागाविषयी तक्रार नोंदवल्यास ती तक्रार संबंधित अधिका-यालाही ऑनलाईनव्दारे दिसणार आहे. मोबाईलवरुन समस्या सांगणे, ऑनलाईन पोर्टलवर समस्या नोंदवणे, त्याचा पाठपुरावा, तक्रारीची सद्यास्थिती, समस्येची सोडवणूक याविषयीची माहिती सामान्यांना त्यांच्या मोबाईलमार्फत उपलब्ध होणार आहे. जातीचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र मिळण्यातील दिरंगाई, 7/12, 8-अ, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसान भरपाई, पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात केलेली टाळाटाळ, शाळा, अंगणवाडीतील मध्यान्ह भोजन, शेतीविषयक समस्या, अवैध दारु साठयाची विक्री, स्वास्था संबंधित समस्या अथवा ग्रामीण भागातील पाणी, वीज, रस्ते यासारख्या विविध समस्या किंवा तक्रारी ऑनलाईन पोर्टलवर नोंदवता येणार आहेत.
हॅलो चांदा यंत्रणेच्या माध्यमातून तक्रार प्रथम ज्या विभागाच्या संदर्भात असेल तेथील संबंधित अधिका-याकडे जाईल. समजा तालुकास्तरावर तक्रारीची दखल न घेतल्यास वरीष्ठ अधिका-यांकडे अर्थात जिल्हाधिका-यांपर्यत वर्गक्रमण होईल. पालकमंत्री हे देखील डशबोर्डवर कोणत्या अधिका-याकडे किती तक्रारी प्रलंबीत हे पाहू शकतील. त्यामुळे महिन्याभरातच तक्रार निवारणाची अपेक्षा आहे. सामान्य जनतेला स्वत:च्या समस्या मोबाईलव्दारे “ हॅलो चांदा ” या यंत्रणेवर 1800-266-4401 या टोल फ्री नंबरवर सकाळी 10 ते सांयकाळी 5.30 वाजेपर्यंत नोंदवता येणार आहेत. त्याचप्रमाणे www.hellochanda.in या ऑनलाईन पोर्टलवरही समस्या नोंदवता येणार आहेत.
COMMENTS