जंगलात सापडली ‘मोगली गर्ल’,  माकडांसोबत राहिली 10 वर्ष

जंगलात सापडली ‘मोगली गर्ल’, माकडांसोबत राहिली 10 वर्ष

आपण आपल्या लहानपणी जंगल बुकमधील मोगलीबाबत तर आपण ऐकलं असेलच. मोगली, लांडग्यांसोबत वाढणारा, त्यांची भाषा बोलणारा, त्यांच्यासारखा व्यवहार करणारा एक मुलगा. तसेच हे पात्र काल्पनिक होतं मात्र तुम्हाला म्हटलं जंगल बुकमधील मोगली सारखीच एक मोगली गर्ल अस्तित्वात आहे तर…. होय आम्ही गंमत नाही करत तर हे खरं आहे…. उत्तर प्रदेशमध्ये  एका बहराइच जंगलात मोगली गर्ल  सापडली आहे.

उत्तर प्रदेशातील बहराइच जंगलात पोलिसांना एक मुलगी सापडली आहे.  ती मुलगी जंगलातील माकडांसोबत राहात होती. तिचे वागणे ही माकडांसारखेच आहे. आणि माणसांची भाषा अजिबात समजत नाही. पोलीस जेव्हा पेट्रोलिंग करत होते तेव्हा पोलीस निरीक्षक सुरेश यादव यांना कतरनी घाट अभयारण्याच्या मोतीपूर रेंजमध्ये माकडांच्या टोळीत ही मुलगी आढळली. सुरुवातीला माकडांच्या घोळक्याने या मुलीला घेरले आहे, असे पोलिसांना वाटले. पण ही मुलगी मात्र अगदी शांतपणे माकडांसोबत बसली होती. तिचे केस व नखे वाढलेली होती. पोलिसांना ती माकडांसोबत विवस्त्र अवस्थेत आढळली.

पोलिसांनी माकडांपासून तिची सुटका करण्याचा प्रयत्न केला असता माकडांनी जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली व मुलीला सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांचा विरोध केला. मुलगीही माकडांपासून दूर जाण्यास अजिबात तयार होत नव्हती. अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी मुलीची सुटका केली व तिला रुग्णालयात दाखल केले. तिचे वय जवळपास 10 वर्षे असल्याचा अंदाज आहे. तिच्या अंगावर अनेक जखमा आहेत. जंगलात लाकडे वेचणाऱ्यांना पण ही मुलगी माकडांसोबत जंगलात दिसली होती.

या मुलीला कोणी मोगली गर्ल तर कोणी जंगलातील गुडिया म्हणून हाक मारतं. बहुतेक तिने माणसं बघितलेच नसावे म्हणून माणसं बघितले की ती ओरडायला लागते, घाबरते आणि पळण्याचा प्रयत्नही करते. ताटात जेवण वाढल्यास ते जमिनीवर पसरवून माकडासारखे जमिनीवरून उचलून खाते. ती आपल्या दोन्ही पायांवरदेखील उभी राहू शकत नाही कारण ती माकडांप्रमाणेच दोन्ही हात आणि दोन्ही पायाने चालते.

या मुलीबद्दल कोणालाही अधिक माहिती नाही. आता डॉक्टर आणि वनकर्मी तिच्या व्यवहारात बदल आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्याप्रमाणे ती हळू-हळू सामान्य होत आहे. सध्या तिला बहराइचच्या जिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

COMMENTS