जंतरमंतरवर कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे मूत्रप्राशन

जंतरमंतरवर कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे मूत्रप्राशन

दिल्लीत जंतरमंतरवर गेल्या महिनाभरापासून आंदोलन करणाऱ्या तामिळनाडूतील शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला आहे. अनेकदा आंदोलन करूनही सरकार दुर्लक्ष करीत असल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. दुष्काळामुळे पीक जळाल्याने कर्जमाफी आणि आर्थिक मदत मिळावी, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. पण आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी आज (शनिवारी) सरकारचा निषेध करण्यासाठी मूत्रप्राशन केले. सरकारने दखल न घेतल्यास उद्या, रविवारी मानवी मैला खाण्याचीही धमकी देखील दिली आहे.

 

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 40 हजार कोटींची मदत जाहीर करावी, या मागणीसाठी तामिळनाडूतील शेतकऱ्यांचे दिल्लीतील जंतरमंतरवर महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे. सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करावे, कर्जमाफी आणि आर्थिक मदत द्यावी, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. महिनाभरापासून या शेतकऱ्यांनी विविध मार्गांनी आंदोलन केले. काही दिवसांपूर्वी जंतर मंतर येथे आंदोलनाला बसलेल्या तामिळनाडूतील शेतकऱ्यांपैकी सात जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पंतप्रधान कार्यालयात नेण्यात आले होते. पण पंतप्रधान मोदींच्या व्यस्त वेळापत्रकामुळे शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आणि पंतप्रधानांची भेट होऊ शकली नाही. अखेर पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शिष्टमंडळाला माघारी फिरावे लागले होते. त्यानंतर पोलिसांच्या वाहनातून या सर्वांना आंदोलनाच्या ठिकाणी घेऊन जात होते. त्याचवेळी एका शेतकऱ्याने वाहनातून उडी मारली आणि आपल्या अंगावरील कपडे काढून तो रस्त्यावर पळू लागला. आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशा घोषणाही त्यांनी दिल्या होत्या. या शेतकऱ्यांनी यापूर्वी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे सांगाडे आणून आंदोलन केले होते. तर उंदीर खाऊनही या शेतकऱ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा निषेध दर्शवला होता. आतापर्यंत विविध मार्गांनी आंदोलन करूनही पदरी निराशा पडलेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक रूप धारण केले आहे.

 

आज जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सोबत बाटल्यांमध्ये मूत्र आणले होते. सरकारच्या निषेध नोंदवण्यासाठी त्यांनी मूत्रप्राशन केले. सरकारने दखल न घेतल्यास उद्या, रविवारी मानवी मैला खाण्याची धमकी दिली आहे.

COMMENTS