जीन्स घालणारे शेतकरी कसे ? भाजपचे मंत्री बरळले !

जीन्स घालणारे शेतकरी कसे ? भाजपचे मंत्री बरळले !

दिल्ली – शेतकरी आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्र पेटला असताना त्याला शांत करण्याचं सोडून भाजपचे मंत्री शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच जणू प्रयत्न करत आहेत की काय अशी वक्तव्य त्यांच्याकडून केली जात आहेत. केंद्रात महत्वाच्या अशा गृहराज्यमंत्रीपदावर कार्यरत असलेले हंसराज अहिर यांनी असेच वक्तव्य केले आहे. शेतकरी आंदोलनात जीन्स पॅन्ट घालून काहीजण आंदोलन करत आहेत, त्यामुळे ते शेतकरीच आहेत का असा संशय निर्माण होत आहे असं अहिर यांचं म्हणणं आहे. शेतकरी संपाच्या आंदोलनात सर्वसामान्य शेतकरी उत्सफुर्तपणे सहभागी झाला आहे. त्याच्या आक्रोशाची दखल घेण्याऐवजी, त्याच्या दुःखावर फुंकर घालण्याऐवजी मंत्रीमहोदय विषय भलतीकडेच नेण्याचा प्रय़त्न करत आहेत. शेतक-याच्या पोरांनी काय घालायचं हे पण तुम्हीच ठरवणार का ? शेतकरी आहे म्हणून त्यानं धोतरचं घालायचं का ? तरुण शेतक-याला जीन्स घालावीशी वाटली तर त्याने ती घालू नये का ? बरं  जीन्स पॅन्टच्या किमती आणि साध्या पँन्टच्या किमती यामध्ये काय फरक आहे ? हे प्रश्न मंत्रीमहोदयांना विचारायला हवेत. हे मंत्रीमहाशय एवढ्यावरच थांबले नाहीत.  शेतक-यांनी आंदोलन थांबवावे आणि अन्नधान्य फेकून देऊ नये असे उपदेशाचे डोसही त्यांनी पाजले. अहो, अहिरसाहेब कांदा, टोमॅटो 2 रुपये किलोने विकण्यापेक्षा शेतकरी फेकून देत होता. कारण त्याला ते बाजारात आणणंही परवडत नव्हतं, त्यावेळी तुम्ही, तुमचा पक्ष किंवा तुमचे मुख्यमंत्री किंवा तुमचे पंतप्रधान अन्नाची नासाडी होते असं कधी बोलल्याचं आठवत नाही. आताच तुम्हाला शेतमालाच्या नासाडीचा कळवळा कसा येऊ लागला आहे ?

COMMENTS