बिहरच्या राजकारणात आणखी एक नवा पक्ष अस्तित्वात येणार आहे. नितीशकुमारांच्या भाजपसोबत जाण्यास पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव तयार नाहीत. ते राजद आणि काँग्रेस आघाडीसोबतच राहण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे लवकरच ते जेडीयूला रामराम ठोकतील असा अंदाज आहे. पक्षाच्या बाहेर पडून ते इतर पक्षात जाण्याऐवजी नवा पक्ष काढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान जेडीयूचे सरचिटणीस के सी त्यागी यांनी मात्र ही अफवा असल्याचं सांगत हे वृत्त फेटाळून लावले आहे.
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळाचा सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनानंतर विस्तार केला जाणार आहे. त्यामध्ये शरद यादव यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असंही बोलंलं जातंय. मात्र शरद यादव त्याला तयार नसल्याचं बोललं जातंय. शरद यादव यांनी नवा पक्ष काढल्यास त्यांच्यासोबत कोण जाणार याबाबत उत्सुकता आहे. जेडीयूमधील मुस्लिम आणि यादव आमदार भाजपसोबत जाण्यास उत्सुक नसल्याचं बोलंलं जातंय. त्यामुळे ते आमदार शरद यादव यांच्यासोबत जाणार का असाही प्रश्न उपस्थित होतो. मात्र पक्षांर्तरबंदी कायद्यामुळे त्यांना राजीनामा देऊनच पक्ष बदल करावा लागणार आहे. त्याचं धाडस हे आमदार दाखवतील का असाही प्रश्न आहे ?
COMMENTS