चेन्नई – डीएमकेचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांना आज सकाळी सव्वासहाच्या सुमारास चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डिसेंबरमध्ये लावण्यात आलेली ‘फीडिंग ट्यूब’ बदलण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून संध्याकाळपर्यंत सोडण्यात येईल, अशी माहिती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक एस. एस. अरविंदन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
डिसेंबरमध्ये त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी ‘ट्रेकिआटमी’ करण्यात आली होती. रुग्णालयात दाखल करताना त्यांची पत्नी राजति अम्मल, मुलगी आणि खासदार कनिमोळी, मोठी मुलगी सेल्व्ही आणि डीएमकेचे नेते पोनमुडी, विरोधी पक्षनेते एम. दुरुमुरुग्नन आदी उपस्थित होते. त्यांचे पूत्र आणि डीएमकेचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन लंडन दौऱ्यावर गेले आहेत.
करुणानिधी वयाच्या 93 व्या वर्षीही राजकारणात सक्रिय असले, तरीही अलीकडच्या काळात त्यांची जाहीर कार्यक्रमांतील उपस्थिती कमी झाली आहे. गेले काही महिने राज्यातील घडामोडी आणि विषयांवर करुणानिधी यांची भूमिका प्रसिद्धीपत्रकांद्वारे मांडली जात आहे.
COMMENTS