अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी निवडणुकीच्या प्रचाराचं काम करणारी कंपनी आता भारतात यूपीएसाठी काम करण्याची शक्यता आहे. केंब्रिज अनालिटीका या कंपनीने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी संपूर्ण प्रचार काळात सल्लागार म्हणून काम केलं होतं. त्या कंपनीचे सर्वेसर्वा अलेक्झांडर हे 19 जुलै ते 21 जुलै या काळात भारतात येणार आहेत. या काळात ते यूपीएच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची ते भेट घेणार आहेत. अलेक्झांडर यांच्या टीममध्ये भारतातील प्रतिनिधी म्हणून अबंरिश त्यागी यांची निवड करण्यात आली आहे. ते जेडीयूचे नेते के सी त्यागी यांचे पुत्र आहेत. निवडणुकीच्या काळात यूपीएची संभाव्य रणनिती काय असावी, सत्ताधारी भाजपचा प्रतिकार कसा करावा, कोणता कार्यक्रम हाती घ्यावा या सर्व बाबींवर या बैठकांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणज्ये अलेक्झांडर हे काँग्रेसमधून फक्त प्रियंका गांधी यांची भेट घेण्याची शक्याता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या सोशल मीडियाची जबाबदारी आगामी काळात प्रियंका गांधी यांच्याकडे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या कंपनीने ट्रम्प यांच्याशिवाय जगभरातील सुमारे 40 देशांमध्ये अशा प्रकारचं काम केलेलं आहे.
COMMENTS