एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी बंदी आणल्याप्रकरणी, शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी लोकसभेत लक्षवेधी मांडली. खा. गायकवाडांवर आणलेली बंदी ही चुकीची असून हा संचार स्वातंत्र्यावर घाला असल्याचे आडसूळ यांनी यात म्हटले आहे.
“एअर इंडियाने खासदारांवर गुन्हा दाखल केला आहे. पण सर्वच विमान कंपन्यांनी त्यांच्यावर बंदी घालणे चुकीचे आहे. कुठेही प्रवास करता येणे हा प्रत्येकाचा संविधानिक हक्क आहे. त्यामुळे अशी बंदी घालणे हे आपल्या मुलभूत हक्कापासून वंचित करणे आहे. याबाबतीत सर्व खासदार सहकार्य करतील अशी माझी अपेक्षा आहे. अध्यक्षांनी सरकारला निर्देश द्यावे, कपिल शर्मा यांनी मारहाण केली परंतु त्यावर चौकशी सुरु आहे. इथे मात्र थेट बंदी घालण्यात आली आहे, याची नागरी उड्डाणमंत्र्यांनी याची दखल घ्यावी. विमान कंपन्यांनी बंदी उठवावी”, असे खा. आनंदराव अडसूळ म्हणाले.
खा. रवींद्र गायकवाड काळ्या यादीत
पुण्याहून दिल्ली प्रवास करताना इकॉनॉमिक आणि बिझनेस क्लासच्या सीटवरुन खासदार गायकवाड आणि एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यात वाद झाला होता. यानंतर रवींद्र गायकवाडांनी त्या कर्मचाऱ्याला चप्पलेनं मारहाण केली. यानंतर सर्व विमान कंपन्यांनी मिळून रवींद्र गायकवाड यांना विमान प्रवाशांच्या यादीतून काळ्या यादीत टाकलंय.
COMMENTS