तामिळनाडूमध्ये पुन्हा राजकीय अस्थिरता निर्मिण झाली आहे. तामिळनाडूतील माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम आणि विद्यमान मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या मनोमीलनानंतर अण्णा द्रमुकमधील संघर्ष संपला असे वाटत होते. मात्र, मंगळवारी सकाळी अण्णा द्रमुकचे उप महासचिव टीटीव्ही दिनकरन यांच्या समर्थकांनी बंडखोरी केल्याने तामिळनाडूच्या राजकारणात नवीन वळण आला आहे. 19 बंडखोर आमदारांनी आज सकाळी टीटीव्ही दिनकरन यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे राजभवनात पोहचल्यावर जाहीर केले.
बंडखोर आमदारांनी राजभवनात येण्यापूर्वी मरीना बीच येथील जयललिता यांच्या समाधीचे दर्शनही घेतले होते. या ठिकाणी त्यांनी काही काळ प्रार्थना केली. त्यानंतर हे बंडखोर आमदार ई. पलानीस्वामी सरकारविरोधातील अविश्वास ठराव घेऊन राजभवनात पोहचले. यावेळी त्यांनी राज्यपालांकडे पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करण्याची मागणी केली.
गेल्या काही दिवसांपासून पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी हे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील अशी शक्यता वर्तवली जात होती. दोन्ही गटांमध्ये चर्चादेखील सुरु होती. अखेर काल या दोन्ही गटांनी एकत्र येण्याची घोषणा केली. दोन्ही गट एकत्र आल्यानंतर आता तामिळनाडूत एआयएडीएमकेची ताकद वाढली आहे. अम्मासाठी (जयललिता) आम्ही एकत्र आलो असे दोन्ही नेत्यांनी सांगितले.
COMMENTS