आपल्या बाळाला पाठिशी बांधून उभा दगडी कडा चढणाऱ्या हिरकणीची कहाणी तुम्हाला माहीत असेलच. अशीच एक हिरकणी मुंबईत आहे. काँग्रेसच्या मालाड मार्वेमधील नवनिर्वाचित नगरसेविका स्टेफी केणी चक्क तीन महिन्यांच्या बाळाला घेऊन पालिकेत हजेरी लावत आहेत. एका बाजूला मातृत्व आणि दुसरीकडे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य अशी कसरत करत सभागृह आणि विभागातील कामांसाठी बाळाला सोबत घेऊनच स्टेफी यांना नवीन जबाबदारी पार पाडावी लागत आहे.
महापालिका निवडणूक जिंकून नगरसेवक झालेले महापालिका सदस्य जिथे सभागृहाला दांडी मारतात, तिथे नवनिर्वाचित नगरसेवक सभागृहाला विशेष महत्व देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे स्टेफी यांच्या पतीने, चक्क नोकरी सोडून नगरसेवक पत्नीला साथ देत बाळाचा सांभाळ करण्याची जबाबदारी स्विकारली आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मालाड मार्वेमधून काँग्रेसच्या उमेदवार स्टेफी केणी या विजयी झाल्या आहेत. पालिकेची निवडणूक झाल्यानंतर सभागृहाची तिसरी बैठक सोमवारी पार पडली. महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीसह सभागृहाच्या बैठकांना स्टेफी केणी या आपल्या तीन महिन्यांच्या बाळाला घेऊन पालिकेत येत आहेत. मुलाला नातेवाईकांच्या ताब्यात देऊन कामकाजा करता त्या सभागृहात निघून जातात. त्यामुळे पालिका सभागृहाच्या आवारातील या छोट्या बाळाची हजेरी हा चर्चेचा विषय आहे. या बाळाचे नाव सॅन्चेस असे आहे. स्टेफी केणी यांचे पती मार्यू ग्रेसेस हे पालिकेत मुलाला खेळवत पत्नीला सहकार्य करत असतात.
केणी कुटुंबाला मढ मार्वे येथून प्रवास करत पालिका मुख्यालयालयात येण्यासाठी दोन ते अडीच तासाचा वेळ लागतो. तर संध्याकाळी घरी जायला तीनपेक्षाही अधिक तास लागतात. ‘कधी आई तर मी, स्टेफी सभागृहात गेल्यानंतर बाळाला सांभाळत असतो. नगरसेवक म्हणून स्टेफी निवडून आल्यानंतर तिला पाठिंबा देण्यासाठी व बाळाला अधिक वेळ देता यावा, म्हणून मला नोकरी सोडावी लागली आहे. परंतु, बाळ मोठा झाल्यास आपण पुन्हा नोकरी करू’, असे मार्यू ग्रेसेस यांनी सांगितले.
पालिका सभांना उपस्थित राहणे आवश्यक आहेच. तसेच बाळ लहान असल्यामुळे त्याला सोबत आणण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे कधी आई, तर सासू तर कधी नवरा आपल्यासोबत येऊन बाळाचा सांभाळ करत असतात. मात्र, सभागृह उशिरा सुरू होत असल्यामुळे माझी अडचण होते, असे स्टेफी यांनी सांगितले. सभागृहातील कामकाज समजून घेणे आवश्यक आहे. त्यातच मुलाला घेऊन बसवण्यासाठी महिलांसाठी माता व बाल कक्ष तयार करण्यात यावा,अशी मागणी आपण करणार असल्याचे स्टेफी केणी यांनी सांगितले. पक्षाचे कार्यालय असले तरी त्यामध्ये महिलांसाठी व्यवस्था नसल्यामुळे पालिकेने स्वतंत्र कक्षाची व्यवस्था गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
COMMENTS